भोपाळ : मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पदभार स्वीकारताच एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवण्यास मुख्यमंत्र्यांनी बंदी घातली आहे. राजधानी भोपाळमध्ये झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी आज भोपाळमध्ये मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. पहिलाच निर्णय त्यांनी मोठा घेऊन लाऊडस्पीकर विरोधात कठोर भूमिका घेतली.
दरम्यान, मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळांसह सर्वत्र लाऊडस्पीकरच्या वापरावर मुख्यमंत्र्यांनी बंदी घातली आहे. मर्यादित आवाज सोडायला हवा, असे ते यावेळी म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लाऊडस्पीकर तपासण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये पथके तयार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ.मोहन यादव यांनी त्यांच्या जन्मगावी उज्जैन येथे जाऊन तेथे महाकालचे दर्शन घेतले. तिथून ते थेट भोपाळला परतले आणि त्यांनी बैठक घेतली.
मोहन यादव यांचा मोठा निर्णय भोपाळमध्ये कॅबिनेटची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांना तिथे जायला उशीर होत होता. त्यामुळे महाकालची पूजा आणि आरती झाल्यानंतर ते लगेच भोपाळकडे रवाना झाले. महाकालचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, "शपथ घेतल्यानंतर मी बाबा महाकालच्या दरबारात आलो आहे. माझ्यावर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे, म्हणून मी बाबा महाकाल यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो. कॅबिनेट बैठकीसाठी मी भोपाळला रवाना होत आहे. यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनचे सरकार मध्य प्रदेशात आणखी प्रगती करेल."
कोण आहेत मोहन यादव?मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अर्थात मोहन यादव २०१३ मध्ये पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आमदार होण्याचा मान पटकावला. २०२० मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा याच जागेवरून निवडणूक जिंकली. अशातच आता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री करून राजकीय पंडितांना देखील धक्का दिला.