घड्याळ सांगणार लग्नाचा मुहूर्त!, जगातील पहिले वैदिक घड्याळ उज्जैनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 09:52 AM2023-08-29T09:52:50+5:302023-08-29T09:53:21+5:30
६० फूट उंचीचा सात मजली टॉवर सप्टेंबरअखेर तयार होईल. त्यावर चार दिशांना चार घड्याळे लावण्यात येणार आहेत.
उज्जैन : कालगणनेचे केंद्रस्थान राहिलेले महाकालाचे शहर उज्जैन हे येत्या काळात देशाला आणि जगाला वैदिक आधारावर वेळ सांगणार आहे. जिवाजी वेधशाळेत देशातील पहिल्या वैदिक घड्याळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ६० फूट उंचीचा सात मजली टॉवर सप्टेंबरअखेर तयार होईल. त्यावर चार दिशांना चार घड्याळे लावण्यात येणार आहेत.
उद्देश काय?
वैदिक घड्याळाची स्थापना करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना भारतीय (वैदिक) वेळेची ओळख करून देणे आहे. वैदिक घड्याळाला सूर्याची स्थिती आणि जगभरातील विविध ठिकाणच्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेशी जोडले जाईल.
वैदिक घड्याळ काय आहे?
वैदिक घड्याळात वेळेसह लग्न, ग्रहण, मुहूर्त आणि सण यांची माहिती मिळू शकते. सध्याच्या ग्रीनविच पद्धतीच्या २४ तासांना ३० मुहूर्तांमध्ये विभागलेले आहेत. वेळ क्षणात आणि घटीमध्ये विभागली आहे. वैदिक घड्याळात सध्याच्या ग्रीनविच पद्धतीचे तास, मिनिटे आणि सेकंद असलेले घड्याळ देखील असेल.
३००वर्षे जुन्या जिवाजी वेधशाळेत १.६२ कोटी रुपये खर्चून वैदिक घड्याळ तयार करण्यात येईल. लखनौमधील एका तज्ज्ञाकडून वैदिक घड्याळ तयार केले जात आहे. हे जगातील पहिले वैदिक घड्याळ असेल.
मोबाइलमध्येही वेळ पाहू शकणार : वैदिक घड्याळ वाचण्यासाठी ॲप तयार करण्याचीही योजना आहे. याद्वारे नागरिकांना स्मार्टफोन, संगणक, टीव्ही आणि इतर संबंधित उपकरणांवर याची माहिती मिळेल. वैदिक घड्याळात ज्योतिर्लिंग, नवग्रह दाखवण्यात येणार आहेत.