भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणऱ्या "ग्लोबल इन्वेस्टर्स समिट"मध्ये सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी उद्योजकांना आमंत्रित केले आहे. "ग्लोबल इन्वेस्टर्स समिट" भोपाळ येथे होणार आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव उद्योग आणि गुंतवणूकदारांच्या प्रमुख प्रतिनिधींना संबोधित करत होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. यादव म्हणाले की, मध्य प्रदेश हे औद्योगिक उपक्रम आणि गुंतवणुकीसाठी मोठी संधी असलेले राज्य आहे. २०२५ हे वर्ष मध्य प्रदेशमध्ये उद्योग आणि रोजगाराचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. औद्योगिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणि मध्य प्रदेशला आर्थिकदृष्ट्या अधिक प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी, गुंतवणूक-अनुकूल धोरणे, चांगल्या पायाभूत सुविधा आणि कौशल्य वर्करची उपलब्धता यावर विशेष लक्ष दिले जात आहे. नैसर्गिक सौंदर्य, धार्मिक स्थळे आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह मध्य प्रदेश गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक ठिकाण म्हणून उदयास येत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी व्यक्त केला.
देशभरातील विविध शहरांमध्ये चर्चासत्रे
मध्य प्रदेशची औद्योगिक, आर्थिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले इंदूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात आघाडीवर आहे. पीथमपूर आणि मंडीदीप ही केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रमुख औद्योगिक केंद्रे म्हणून विकसित झालेली आहेत. शिक्षण, आरोग्य, खाणकाम, औषधनिर्माण, पर्यटन, आयटी यांसह अनेकविध क्षेत्रांमध्ये सुलभ आणि आकर्षक धोरणे विकसित करण्यात आली आहेत. मध्य प्रदेशमधील विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये औद्योगिक समूह आणि गुंतवणूकदारांसोबत चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे येथे अशाच एका सत्राचे आयोजन करण्यात आले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
"ईज ऑफ डूइंग बिजनेस"वर अधिक भर
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, "ईज ऑफ डूइंग बिजनेस"वर मध्य प्रदेश सरकार विशेष लक्ष देत आहे. मध्य प्रदेशातील उद्योगांना कामगार समस्यांसह अडचणींचा सामना करावा लागत नाही. कामाकडे एकाग्रतेने लक्ष देणे हा राज्यातील लोकांचा एक विशेष गुण आहे. ईज ऑफ डूइंग बिजनेसची कल्पना सरकार आणि समाजात खोलवर रुजलेली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्थापनाच्या युगात मध्य प्रदेशातील उद्योगांचे कामकाज सुलभ झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या "ग्लोबल इन्वेस्टर्स समिट"च्या माध्यमातून उद्योग समूह आणि मध्य प्रदेश राज्याचे संबंध अधिक मजबूत होतील, असे मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात उद्योग आणि उद्योजकांचे योगदान महत्त्वाचे आहे. लष्करातील एखादा सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करतो तर उद्योगपती आपल्या व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर देशाला सक्षम, समृद्ध आणि वैभवशाली बनवण्यात योगदान देतो. औद्योगिक समूह हे रोजगार उपलब्ध करून देण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे ऐतिहासिकदृष्ट्या सौहार्दपूर्ण संबंध
मुख्यमंत्री डॉ. यादव पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशचे महाराष्ट्राशी असलेले नाते नवीन नाही. पुण्यातील वातावरण मध्य प्रदेशसारखे आहे. माळव्यातील सर्व धार्मिक स्थळे महाराष्ट्राशी संबंधित आहेत. मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी छत्रपती शिवाजी, शिंदे, होळकर, पेशवे यांचा उल्लेख करताना सांगितले की, लोकमाता अहिल्या देवी यांनी सुशासन, शौर्य, कौशल्य विकास तसेच धर्माच्या क्षेत्रात अद्भूत कार्य करून आदर्श प्रस्थापित केले आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेले त्यांचे राज्य देशात सुशासनाचे एक आदर्श बनले आहेत. मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी सांगितले की, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संतु निरामय या भावनेनुसार आम्ही इतर राज्ये आणि देशभरातून येणाऱ्या उद्योगांचे स्वागत करतो. सर्वांच्या कल्याणाची आणि प्रगतीची कामना करतो. मध्य प्रदेशच्या औद्योगिक भविष्याला आकार देण्यासाठी आणि आर्थिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्लोबल समिट उत्प्रेरकाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुण्यातील चर्चा सत्रात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी विविध क्षेत्रातील उद्योगपतींशी वन टू वन चर्चा केली. त्यांना गुंतवणुकीच्या संधी आणि शक्यतांबद्दल माहिती दिली. राज्यातील औद्योगिक विकासासाठी देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा तसेच सुलभ औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्ये याबद्दल मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना माहिती दिली.