भोपाळ : मध्य प्रदेशातील महिलांना आता पंचायत निवडणुकीत ५० टक्के आरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली. शनिवारी टिमकगडमधील जतारा येथे आयोजित लाडली बहना संमेलनात शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. यावेळी १२८.८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजनही त्यांनी येथे केले. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमारही सहभागी झाले होते.
यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, भगिनींनो हा एक हजार रुपये नाही तर तुमचा सन्मान आहे. मी मुलींना ओझं बनू देणार नाही. मी बहिणींचा खरा भाऊ आहे. मी दर महिन्याला त्यांच्या खात्यात 1000 रुपये टाकेन. पैशामुळे आपल्या मनात विश्वास निर्माण होतो. पैसा असेल तर हिंमत आहे. पैशाने विश्वास वाढतो आणि आदरही वाढतो. आता बहिणींना घरात मान मिळू लागला आहे, असेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
याचबरोबर, आता फक्त एक हजार रुपयांपासून सुरुवात केली आहे. मी माझ्या बहिणींना आणखी मजबूत करीन. मी दर महिन्याला बहिणींच्या खात्यात १५ हजार कोटी रुपये टाकतो. पुढे जाऊन एक हजाराऐवजी तीन हजार रुपये टाकेन. तुमचे आयुष्य बदलायला, तुमचा भाऊ शिवराज आला आहे. मला भगिनींच्या गटाचे उत्पन्न महिन्याला दहा हजार रुपये करायचे आहे. आई-बहीण-मुलीचा आदर सर्वात मोठा आहे, असेही शिवराज सिंह चौहान म्हणाले.
मुलांची सायकल आणि फीही सरकार देणारज्या महिला राहिल्या आहेत, त्यांचीही पुढील महिन्यात नोंदणी केली जाईल. एवढेच नाही तर सायकलसाठी मुलांच्या खात्यात पैसेही टाकले जातील. अभ्यासाची फीही भरली जाईल. सरकारी नोकऱ्यांमध्ये गरीब मुलांची सतत भरती सुरू आहे. मी १३ ऑगस्टपासून मुख्यमंत्री शिका कमवा योजना सुरू करणार आहे. यात मी ८ हजार रुपये देईन, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेस बेईमानी करत आहे. काँग्रेसवाले देशाला लुटायला निघाले आहेत.