'हा तोच काँग्रेस पक्ष आहे, ज्याला वाटत होतं की, राम मंदीर बनणारच नाही, मात्र, अयोध्येत भव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आहे. आम्ही जे करतो, ते करून दाखवतो,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मध्य प्रदेशातील बैतूल येथे एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला.
मोदी म्हणाले, आपण उद्या आदिवासी गौरव दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या भूमीवर जात आहोत. आम्ही सरकारची तिजोरी गरिबांसाठी खुली केली आहे. काँग्रेसच्या पंजाला केवळ लुटणेच माहीत आहे. उद्या आदिवासी गौरव दिनानिमित्त भाजप 24 हजार कोटी रुपयांची मोठी योजना सुरू करत आहे. एवढेच नाही, तर काँग्रेसने पराभव स्वीकारल्याची माहितीही आम्हाला मध्यप्रदेशातून मिळत आहे.
मोदीच्या गॅरंटीसमोर काँग्रेसची खोटी आश्वासने टिकू शकत नाहीत -काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, मध्य प्रदेशात काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे. मोदीच्या गॅरंटीसमोर काँग्रेसची खोटी आश्वासने क्षणभरही टिकू शकत नाहीत, हे काँग्रेसने मान्य केले आहे. मोदींची गॅरंटी म्हणजे, गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी. 17 नोव्हेंबर तारीख जस-जशी जवळ येत आहे, तस-तसे काँग्रेसच्या नेत्यांच्या आश्वासनांची पोल खोल होत आहे. एवढेच नाही, तर काँग्रेसने पराभव मान्य करून, स्वतःला नशिबाच्या भरवशावर सोडले असल्याच्या बातम्या आम्हाला संपूर्ण मध्यप्रदेशातून मिळत आहेत, असेही मोदी म्हणाले.
भाजपच्या संकल्प पत्राचाही उल्लेख -यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश भाजपच्या संकल्प पत्रावरही भाष्य केले. ते म्हणाले, मध्य प्रदेश भाजपने प्रत्येक क्षेत्रासाठी आणि प्रत्येक विभागासाठी एक सुंदर संकल्प पत्र जारी केले आहे. हे संकल्प पत्र म्हणजे, मध्य प्रदेशातील जनतेचे विकास पत्र आहे. प्रत्येक आदिवासीबहुल गटात एकलव्य निवासी शाळा, प्रत्येक आदिवासी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, लाडली बहन अंतर्गत आर्थिक मदत, याच बरोबर, कायमची पक्की घरे आणि शेतकऱ्यांच्या भात-गव्हासाठी एमएसपीसाठी मध्य प्रदेश भाजपच्या गॅरंटीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.