सागर : मध्य प्रदेशात वर्षअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत. या आगामी विधानसभा निवडणुकीकडे काँग्रेसच्या नजरा लागल्या आहेत. सत्ताधारी भाजपशिवाय काँग्रेसनेही निवडणुकीची तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मंगळवारी मध्य प्रदेशमध्ये दाखल झाले. यावेळी सतनामध्ये सभेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी अनेक घोषणा केल्या.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये जातनिहाय जनगणना करणार आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. तसेच, आमचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. एलपीजी सिलिंडर फक्त ५०० रुपयांना मिळेल. तसेच, महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. याशिवाय, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना आणली जाणार आहे. १०० युनिटपर्यंत वीज बिल घेतले जाणार नाही, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. तसेच, यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, आता आमच्या कार्यकारिणीत मागासवर्गीयांचे ६ लोक आहेत.
याचबरोबर, या सभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवरही निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिफारशीवरून मंजूर झालेल्या बुंदेलखंड पॅकेजची भाजप सरकारने अंमलबजावणी केलेली नाही, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. याशिवाय, मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे . हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील लोकांसाठी पंतप्रधानांनी काहीही केले नाही, असे ते म्हणाले. तसेच, नरेंद्र मोदींनी सागर येथे पूज्य संत रविदास यांच्या १०० कोटी रुपयांच्या अनुसूचित जातींच्या मंदिराची पायाभरणी केली, परंतु दिल्लीत मूर्तीची मोडतोड करण्यात आली, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.