मध्य प्रदेशमधील निवाडी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवाडी येथील पोलिसांनी येथे खळबळ उडवणाऱ्या गुलाब देवी हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. तिची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रियकराने तिला विषारी दारू पाजली. त्यानंतर तिचा मृत्यू झाल्यावर आरोपी प्रियकराने तिचा मृतदेह शेतामध्ये पुरला. त्यानंतर जवळपास महिनाभर तो तिचा मृतदेह पुरलेल्या जागेवरच झोपत होता. अखेर महिनाभरानंतर संधी पाहून त्याने तिचा मृतदेह बाहेर काढला आणि एका पुलाशेजारी नेऊन फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी या आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत निवाडीचे एसपी राय सिंह यांनी सांगितले की, सदर महिलेची हत्या ३ जून रोजी झाली होती. त्यावेळी पोलिसांना काहीच सुगावा लागत नसल्याने तपास चाचपडत होता. मृत महिलेचं नाव गुलाब देवी पाल असं होतं. तसेच तिची हत्या ही तिचा प्रियकर असलेल्या मदन कुशवाहा याने केली होती. आता पोलिसांनी मदनला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. आरोपीने पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
३ जून रोजी काशीपुरा येथील रहिवासी कालिचरण पाल याने पोलीस ठाण्यात धाव घेत त्याची पत्नी गुलाब देवी पाल ही गायब झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान, सिनौनियो येथील जंगलात पुलाजलवळ एका महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी कालिचरण आणि नातेवाईकांना बोलावून या मृतदेहाची ओळख पटवली. त्यांनी हा मृतदेह गुलाब देवी हिचाच असल्याचे सांगितले.
मात्र त्याचदरम्यान, मृत महिलेचा मोबाईल चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच या फोनचं लोकेशन सातत्याने बदलत असल्याचंही समोर आलं. त्यानंतर पोलिसांना एकेक तांत्रिक पुरावा गोळा करत मृत महिलेचा मित्र मदन कुशवाहा याच्यापर्यंत तपासाचे धागेदोरे नेले. त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली. मदन कुशवाह याने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने हत्येचा गुन्हा कबूल केला आणि या गुन्ह्यामागची सारी कहाणी पोलिसांना सांगितली.
आरोपी मदन कुशवाहा याने सांगितले की, मृत महिलेकडून कुणीतर पेसै घेतले होते. तो हे पैसे परत करत नव्हता. तेव्हा आरोपीने मध्यस्थी करून त्यामधील काही रक्कम परत मिळवली. मात्र त्या रकमेमधील केवळ ५ हजार रुपये त्याने गुलाब हिला दिले. मात्र सगळे पैसे मिळावेत, यासाठी गुलाब हिने तगादा लावला होता. तेव्हा आरोपीने सगळं काम झाल्यावर जेव्हा सगळे पैसे मिळतील तेव्हा पैसे देऊ असे आरोपीने सांगितले. मात्र सदर महिलेने त्याचं ऐकलं नाही. त्यामुळे संतापून आरोपी मदन याने तिची हत्या केली.