संतापजनक! बहिणीची काढली छेड, भावाची बेदम मारहाण करून हत्या, वाचवायला धावलेल्या आईला केलं विवस्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 02:23 PM2023-08-27T14:23:03+5:302023-08-27T14:23:29+5:30
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही गावगुंडांनी छेडछाडीच्या प्रकरणात तडजोड करण्यास नकार दिल्याने एका दलित कुटुंबातील तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे.
मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही गावगुंडांनी छेडछाडीच्या प्रकरणात तडजोड करण्यास नकार दिल्याने एका दलित कुटुंबातील तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच या आरोपींनी तरुणास वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या आईलाही विवस्त्र केल्याचा आरोप आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सागर जिल्ह्यातील खुरई देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरोदिया नौनागिर येथे घडली आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींनी मृत तरुणाच्या बहिणीची छेड काढली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. मात्र आरोपी याबाबतची तक्रार मागे घेऊन तडजोड करण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव आणत होते. दरम्यान, या तरुणीचा भाऊ गुरुवारी रात्री बाजारात गेला असता या गावगुंडांनी त्याला अडवले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई धावली असता तिलाही विवस्त्र करून मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ९ आणि इतर ४ आरोपींविरोधात हत्येसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी मुख्य आरोपीसह ८ अन्य आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेमागे असलेले गावातील सरपंच पतीसह फरार आहेत.
मृत तरुणाच्या बहिणीने सांगितले की, गावामधील विक्रम सिंह, कोमल सिंह आणि आझाद सिंह हे आमच्या घरी आले होते. तसेच तडजोड करण्यासाठी दबाव आणत होते. तेव्हा आईने जेव्हा कोर्टात सुनावणी होईल तेव्हा राजीनामा करू असे सांगितले. तेव्हा आरोपींनी तुम्हाला तुमच्या मुलांचा जीव नको आहे का? अशी धमकी दिली. तसेच तो आम्हाला जिथे भेटेल तिथे त्याला संपवू असे सांगितले. माझा धाकटा भाऊ बस स्टँडजवळ भाजी घेण्यासाठी गेला होता. तिथून तो येत होता. तेव्हा रस्त्यात आरोपींनी त्याला मारहाण केली. तो पळू लागला तेव्हा काही लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मुख्य आरोपी विक्रम सिंह याच्यासह आझाद ठाकूर, इस्लाम खान, सुशील कुमार सोनी, अनीश खान, फरीम खान, अभिषेक रैकवार, अरबाझ खान यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण बरौदिया नौनागिर येथील रहिवासी आहेत. आता आरोपी कोमल सिंह ठाकूर यांच्यासह इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
या घटनेनंतर राजकारणालाही तोंड फुटले आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दलितांवरील अत्याचारावरून मध्य प्रदेश सरकारवर टीका केली आहे. मध्य प्रदेश दलित अत्याचाराची प्रयोगशाळा बनली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.