मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामुळे नेते प्रचंड नाराज आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या महिनाभर आधी या अहवालात अनेक मोठे खुलासे झाले आहेत. या अहवालात गुन्हेगारी, बेहिशेबी संपत्ती आणि साक्षरता याबद्दल सांगण्यात आले आहे. या अहवालानुसार, एकूण 230 आमदारांपैकी 93 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत, तर 186 आमदार करोडपती आहेत.
या अहवालातील सर्वात मोठा खुलासा आमदारांच्या गुन्हेगारी रेकॉर्डवर झाला आहे. मध्य प्रदेशातील एकूण 230 आमदारांपैकी 93 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. गंभीर गुन्हे केलेले 47 आमदार आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्व राजकीय पक्ष रिंगणात आहेत. काँग्रेस भाजपला आव्हान देत असून यावेळी निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
भाजप आमदारांबद्दल बोलायचे झाले तर 129 आमदारांपैकी 39 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. याचबरोबर, काँग्रेसच्या 97 आमदारांपैकी 52 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. मात्र, काहीवेळा आंदोलन करतानाही राजकीय गुन्हे दाखल होतात, असे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. अहवालानुसार, खुनाशी संबंधित प्रकरणे असलेल्या एका आमदाराने खुनाशी संबंधित प्रकरणे घोषित केली आहेत. तसेच, खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित 6 विद्यमान आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.
230 आमदारांपैकी 186 आमदार करोडपतीआता श्रीमंत आमदारांबद्दल सांगायचे झाल्यास, अनेक आमदार नेहमीच असा दावा करतात की, त्यांच्याकडे पैसे नाहीत, पण या अहवालातून असे समोर आले आहे की, मध्य प्रदेशातील 230 आमदारांपैकी 186 आमदार करोडपती आहेत. यामध्ये काँग्रेसचे 97 पैकी 76 आमदार करोडपती आहेत. संजय शुक्ला हे काँग्रेसचे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. संजय शुक्ला यांची एकूण संपत्ती 139 कोटी रुपये आहे. याचबरोबर, भाजपचे 129 पैकी 107 आमदार करोडपती आहेत. भाजपमधील सर्वात श्रीमंत आमदार संजय पाठक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 226 कोटी रुपये आहे.