मध्य प्रदेशमदील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इंदूरच्या महानगरपालिकेच्या आयुक्त हर्षिका सिंह यांच्या कारमध्ये कुणीतरी कापलेलं लिंबू फेकल्याचं समोर आलं आहे. हे कृत्य जादूटोण्याच्या इराद्याने करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आता या प्रकरणाची तक्रार ही पोलिसांकडे देण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच हे कृत्य करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही आणि अन्य मार्गांनी आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार इंदूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कारमध्ये कुठल्या तरी अज्ञात तरुणाने कापलेलं लिंबू टाकलं. जेव्हा ड्रायव्हरने हा प्रकार पाहिला, तेव्हा त्याने याबाबतची माहिती आयुक्त हर्षिका सिंह यांना दिली. त्यानंतर पोलिसांना याबाबतची तक्रार देण्यात आली. आता पोलीस आजूबाजूच्य परिसरातील सीसीटीव्ही तपासून तपास करत आहेत.
या प्रकरणी अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, ड्रायव्हर आणि ४-५ गार्ड जवळच बसले होते. तेवढ्यात एक अज्ञात तरुण तिथे आला. त्याने त्याच्या कारची खिडकी उघडून पालिका आयुक्तांच्या कारच्या दिशेने लिंबू फेकले. हे लिंबू कापलेले होते. त्या आधारावर ड्रायव्हरकडून तक्रार देण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे.
अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोतिया यांनी पुढे सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमधून संपूर्ण प्रकरण स्पष्ट होत आहे. आरोपी मागच्या बाजूने आला आणि त्याच्या गाडीची खिडकी उघडून त्याने आयुक्तांच्या गाडीच्या दिशेने लिंबू फेकले. आता याबाबत तक्रार नोंदवण्यात आली असून, तपास केला जात आहे.