सोशल मीडियाच्या वाढत्या लोकप्रियतेप्रमाणेच सायबर गुन्ह्यांमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. सायबर फसवणुकीचा प्रकार आता जणू काही सामान्यच होत चालला आहे. जी मंडळी आपल्या प्रेयसीची हेरगिरी करण्याच्या प्रयत्नात असते अशांना लक्ष्य केले जाते. अनेकदा प्रेयसीवर लक्ष ठेवू इच्छित असणारे फसवणुकीचे बळी ठरले. अशा काही ॲप्स आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून फसवणूक करणारे प्रियकराला त्याच्या प्रेयसीचे व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल हिस्ट्री पाहण्याचे आमिष दाखवतात आणि पैसे उकळतात. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील आकडेवारी समोर आली, ज्यामध्ये नात्यामध्ये विश्वासाची असलेली कमतरता प्रियकराचा खिसा कापत असल्याचे दिसते.
खरे तर आपली प्रेयसी कोणाशी बोलते, कोणाच्या संपर्कात आहे हे जाणून घेण्याच्या नादात तरुणांना किंबहुना प्रियकर मंडळीला आर्थिक फटका बसतो. काही ठग सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या ॲप्स आणि वेबसाइट्सचा प्रचार करतात. यामाध्यमातून आम्ही व्हॉट्सॲप चॅट्स आणि तुमच्या प्रेयसीच्या मोबाईलची हिस्ट्री दाखवू असे आश्वासन दिले जाते.
संबंधित फसवणुकीचे ॲप्स मोफत असल्याचा दावा केला जातो. मात्र, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. पण, पैसे दिल्यानंतर ॲप काहीच काम करत नाही. अनेकदा पैसे भरुन झाल्यानंतर संबंधितांना आपली फसवणूक झाली असल्याचा अनुभव आला. पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे अशा कित्येक गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, बदनामी होईल या भीतीने बहुतांश तरुण या फसवणुकीला बळी पडत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे फसवणूक झालेल्या तरुणांनी आपली तक्रार घेऊन पोलिसांच्या सायबर सेलमध्ये धाव घेतली, मात्र प्रेयसीची बदनामी होईल या भीतीने ते तक्रार दाखल करत नाहीत.
स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या नामांकित बँकेचे नाव सांगूनही लोकांची फसवणूक केली जात आहे. ठग SBI क्रेडिट मेसेज पाठवतात आणि लोकांना बनावट लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त करतात. या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या खात्यातून पैसे गायब होतात. सणासुदीच्या काळात फसवणूक करणारे ऑनलाइन शॉपिंग पेजेस तयार करून लोकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले. महागडे ब्रँडेड मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू अर्ध्या किमतीत विकण्याचे आश्वासन अशी काही आमिषे दाखवली जातात.