‘दादा तुम्हाला मतदान केलं होतं…’, शिवराज सिंह यांना भेटून रडू लागल्या बहिणी, माजी मुख्यमंत्री झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 02:08 PM2023-12-12T14:08:20+5:302023-12-12T14:09:01+5:30
Shivraj Singh Chouhan: शिवराज सिंह यांच्या राजीनाम्यानंतर काही महिला त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्या ढसाढसा रडू लागल्या. शिवराज सिंह यांनी त्यांना जवळ घेत त्यांना धीर दिला. यावेळी माजी मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंहसुद्धा भावूक झाले.
मध्य प्रदेशमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली आहे. भाजपाने यावेळी राज्यात नेतृत्वबदल करताना शिवराज सिंह चौहान यांच्याऐवजी मोहन यादव यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवले आहे. त्यानंतर १८ वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिवराज सिंह यांच्या राजीनाम्यानंतर काही महिला त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्या ढसाढसा रडू लागल्या. शिवराज सिंह यांनी त्यांना जवळ घेत त्यांना धीर दिला. यावेळी माजी मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंहसुद्धा भावूक झाले.
आता सोशल मीडियावर शिवराज सिंह यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिवराज सिंह चौहान यांना काही महिला भेटण्यासाठी आलेल्या दिसत आहेत. शिवराज सिंह यांना मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने या महिलांनी दु:ख व्यक्त केले. तसेच त्यांना अश्रूही अनावर झाले. तेव्हा शिवराज सिंह यांनी या महिलांना आधार देत त्यांची समजूत काढली.
नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. मध्य प्रदेश विधानसभेतील २३० जागांपैकी १६३ जागांवर भाजपाने बाजी मारली आहे. यावेळी भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला नव्हता. त्यामुळे सुमारे आठवडाभर खल केल्यानंतर सोमवारी भाजपाने आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली.
शिवराज सिंह चौहान यांनी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर आमदारांनी त्याला अनुमोदन दिलं. त्यानंतर अधिकृतपणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावाची घोषणा केली. तर शिवराज सिंह यांनी राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्याकडे पदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर मोहन यादव यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापन करण्याचा दावा केला.