मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तरुण-तरुणीमध्ये परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवण्याचे वय १८ वरून १६ वर्षे करण्याचा विचार करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. आजच्या काळात मुले लवकर तारुण्यात येत असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले आहे.
सध्याच्या आधुनिक काळात किशोरवयीन मुलांचा विकास वेगाने होत आहे. इंटरनेटमुळे त्यांना कमी वयातच ज्ञान मिळत आहे. अशा परिस्थितीमुळे त्यांनी केलेल्या गोष्टी अनेकदा त्यांचे भविष्य अंधारात टाकत आहेत. १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींशी अनेकदा १८ वर्षे पूर्ण झालेले तरुण किंवा कमी वयाची मुले सहमतीने संबंध ठेवतात. परंतू, त्यांच्यावर पोलीस पोक्सो, बलात्कार यासारखे गुन्हे दाखल करतात. विरुद्ध लिंगाच्या आकर्षणातून हे संबंध निर्माण झालेले असतात परंतू त्यात मुलांना दोषी मानले जाते. परंतू ते हे कृत्य त्यांच्या अज्ञानातून करतात. त्यामुळे कित्येक किशोरवयीन मुले अन्यायाला बळी पडतात, असे न्यायालयाने मत नोंदविले आहे.
ग्वाल्हेरच्या थाटीपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या राहुल जाटव विरोधात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 17 जुलै 2020 रोजी राहुल जाटवला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. ही मुलगी कोचिंगसाठी राहुलच्या घरी जात असे. घटनेच्या दिवशी ती क्लासला पोहोचली तेव्हा तिथे कोणीच नव्हते. कोचिंग डायरेक्टर राहुल जाटव याने तिला ज्यूस दिला, त्यानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर राहुलने तिचा अश्लिल व्हिडिओ बनवला आणि तरुणीशी संबंध प्रस्थापित केले, असा आरोप होता.
व्हिडीओ व्हायरल करून संबंध प्रस्थापित करण्याची धमकी देऊन राहुल जाटव तिला सतत ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये तिचा गर्भपात करण्यात आला होता. याच काळात पीडित मुलीने दूरच्या नातेवाईकावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोपही केला होता. दोघांमध्ये परस्पर संमतीने शरीर संबंध निर्माण झाले होते, असा युक्तीवाद जाटवच्या वकिलांनी केला आहे. यामुळे आपल्या अशिलाची फसवणूक झाली आहे, यामुळे जाटववरील गुन्हा रद्द केला जावा अशी मागणी वकिलांनी केली होती.
सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने राहुल जाटव यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द केला आहे. इंटरनेटच्या युगात किशोरवयीन मुलांमध्ये पूर्व-प्रौढत्व लक्षात घेता परस्पर संबंधांचे वय 18 वरून 16 पर्यंत कमी करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे.