मुंबई : परदेशात वैद्यकीय पदवी शिक्षण घेतलेल्या १,०६५ भारतीय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांच्याकडे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांत, खासगी रुग्णालयांत इंटर्नशिप मिळावी म्हणून अर्ज केला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या विद्यार्थ्यांना राज्यातील ७४ रुग्णालयात इंटर्नशिप करण्याची परवानगी दिली असून, त्याची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने त्यांच्या गुणांनुसार त्यांना संबंधित रुग्णालयात इंटर्नशिपसाठी प्रवेश द्यावा, असे सूचित करण्यात आले आहे.काही कारणास्तव भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने असंख्य विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवतात. मात्र, अनेकांना मायदेशी परतून प्रॅक्टिस करायची असते वा पुढील शिक्षण घ्यावयाचे असते.
त्यासाठी परदेशातील वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना देशात स्क्रिनिंग टेस्ट द्यावी लागते. ही परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनतर्फे घेतली जाते. ही परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी त्यांनी ठरविलेल्या राज्याच्या वैद्यकीय परिषदेकडे इंटर्नशिपसाठी अर्ज करतात. त्यानंतर वैद्यकीय परिषद परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर त्यांना उपलब्ध रुग्णालयात इंटर्नशिप करण्यासाठी परवानगी देतात.
...मगच मिळतो रुग्णसेवेचा परवाना- विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या रुग्णालयात एक वर्ष इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला दिल्यानंतर त्यांना महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा रुग्णांना देऊ शकत असल्याचा परवाना मिळतो. ते विद्यार्थी मग राज्यात मेडिकल प्रॅक्टिस करू शकतात किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी तयारी करू शकतात. - देशभरातून परदेशातून शिकून आलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीच्या राज्यातील वैद्यकीय परिषदेला इंटर्नशिपसाठी अर्ज केलेला आहे. त्यात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला १,०६५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
वैद्यकीय शिक्षणासाठी या देशांना पसंती - चीन, युक्रेन, रशिया, जॉर्जिया, फिलिपाइन्स, नेपाळ, कझाकस्तान, किरगिझस्तान, मॉरिशस
ज्या विद्यार्थांनी या इंटर्नशिपसाठी अर्ज केले आहेत त्यांना आम्ही त्यांच्या पसंतीनुसार रुग्णालयाची नावे दिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये भरण्यास सांगणार आहोत. कारण यावेळी इंटर्नशिपसाठी मोठ्या संख्येने रुग्णालये उपलब्ध आहेत. त्याची यादी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जाहीर केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार त्या विद्यार्थ्यांना आम्ही इंटर्नशिपसाठी प्रवेश देऊ. येत्या दोन महिन्यांत किंवा त्यापेक्षा आधी ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.- वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद