मध्य प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. दरम्यान, नागरी उड्डाण मंत्री आणि भाजपचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी मंगळवारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांच्या विधानावरून खरपूस समाचार घेतला.
काँग्रेसने शिवपुरीमधून तगडा उमेदवार उभा केला आहे, त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया घाबरले आणि त्यांनी मैदान सोडले, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला होता. यावर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिग्विजय सिंह यांना गांभीर्याने घेत नसल्याचे एकप्रकारे सांगितले. दसऱ्याच्या मुहूर्तावर ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रदेशात पोहोचले होते. यावेळी येथे पत्रकारांशी बोलत होते.
एका पत्रकाराने ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, ज्योतिरादित्य म्हणाले, "तुम्ही दिग्विजय सिंह यांना कधी गांभीर्याने घेतले आहे का?" दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी नुकतेच म्हटले होते की, भाजप ज्योतिरादित्य सिंधिया यांना शिवपुरीतून तिकीट देणार आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवपुरीतून तगडा उमेदवार उभा केला, मात्र ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घाबरून मैदान सोडले.
दरम्यान, मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. भाजपने आतापर्यंत उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून त्यात २२८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री आणि खासदारांनाही तिकिटे दिली आहेत. शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय राज्यातील २४ मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आले आहे.