मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. भोपाळपासून जवळपास ६० किमी अंतरावर असलेल्या एका शेतात हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं असून यातून सैन्याचे ६ जवान प्रवास करत होते.
बैरसियाच्या डूंगरिया गांवातील एका धरणाजवळील शेतात तांत्रिक अडचणीमुळे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. धरणाजवळ हेलिकॉप्टर काही वेळा हवेत गिरक्या घेत होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यानंतर, त्याचे जवळील एका शेतात इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. सुदैवाने हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. मात्र, गावात सैन्य दलाचे हेलिकॉप्टर उतरवण्यात आल्याने ग्रामस्थांनी तात्काळ धरणाजवळ धाव घेतल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, हेलिकॉप्टरमधील जवानांनी बोलवल्यानंतर सैन्य दलातील इंजिनिअर्स आणि टेक्निशियन्स घटनास्थळी आले आहेत. सध्या, हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडाचा शोध घेऊन, दुरुस्ती केल्यानंतर ते इच्छित स्थळी मार्गस्थ केले जाईल.
वायुसेनेच्या ९१ व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील मोठ्या तलावावर ३० सप्टेंबर रोजी एयर शो चे आयोजन करण्यात आले होते. त्या एअर शो साठीच हे हेलिकॉप्टर आले होते, अशी माहिती समजते. एअर शोनंतर ते बैरसियामार्गे इच्छित स्थळी रवाना होत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचे इमर्जन्सी लँडींग शेतात करण्यात आले.