मुंबई - केंद्र सरकारच्या विविध योजना गावखेड्यात पोहोचल्या पाहिजेत यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात शासन आपल्या दारी हा उपक्रमक राज्य सरकारने राबवला असून त्या माध्यमातून लाभार्थींना सरकारी योजनांचा लाभ दिला जात आहे. तर, विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारही गावखेड्यात पोहोचत आहे. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गावागावातील, आदिवासी पाड्यातील योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला. महिला व विद्यार्थ्यांसोबतही मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी, मध्य प्रदेशातील ललित यांच्यासोबत संवाद साधताना मोदींनाही हसू आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम-जनमन कार्यक्रमांतर्गत आदिवासी महिलांसोबत संवाद साधला. यावेळी, पीएम आवास योजना - ग्रामीण भागातील १ लाख लाभार्थींना पहिला हफ्ता बँक खात्यात जमाही केला. तसेच, लाभार्थी महिलांसोबत थेट मोदींनी संवाद साधला. येथे ललिता नामक महिलेशी संवाद साधताना महिलेनं त्यांच्या कुटुंबीयांस मिळालेल्या लाभाची माहिती दिली.
पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारच्या योजनेतील लाभार्थी महिला ललिता आदिवासी यांच्याशी संवाद साधताना, तुमच्याबद्दल माहिती द्या, असा प्रश्न केला होता. त्यावर, संबंधित महिलेनं स्वत:बद्दल, स्वत:च्या कुटुंबाबद्दल आणि सरकारकडून मिळालेल्या योजनांच्या लाभाबद्दल माहिती दिली. यावेळी, ललिता यांनी अगदी पाठांतर केल्याप्रमाणे एकामागून एक अशी योजनांची व मिळालेल्या लाभाची माहिती दिली. मला तीने मुले असून मोठी मुलगी इयत्ता ६ वीमध्ये शिकत आहे. तिला शिष्यवृत्ती आणि ड्रेस मिळत असून सुकन्या समृद्धी योजनेत तिच्या नावे दरमहा २५० रुपये टाकले जात आहेत. लाडली लक्ष्मी योजनेचाही तिला लाभ मिळत आहे. माझा दुसरा मुलगा दुसरी इयत्तेत असून त्यालाही ड्रेस व मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळतो. तिसरा मुलगा अंगणवाडीत शिक्षण घेत आहे, असे ललिता यांनी मोदींना सांगितले.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातही प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (पीएम-जनमन) योजनेच्या माध्यमातून आज लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी, पंतप्रधान मोदींनी आदिवासी महिला भगिनींशी संवाद साधला. या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे हेही उपस्थित होते.