भोपाळ - पक्षासाठी आणि आपल्या नेत्यासाठी कार्यकर्ते आपलं सर्वस्व पणाला लावतात. अनेकदा वेगवेगळ्या शपथाही घेतल्या जातात. अमुक नेता निवडून येईपर्यंत मी लग्न करणार नाही, किंवा अमूक पक्षाची सत्ता येईपर्यंत मी पायात चप्पल-बुट घालणार नाही, अशा आणाभाका घेतल्या जातात. नुकतेच ५ राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. या ५ राज्यात भाजपला मोठं यश मिळालं. त्यापैकी, तीन राज्यात भाजपाने सरकारही स्थापन केलं. मध्य प्रदेशमध्येही भाजपाने सरकार स्थापन केलं. मात्र, मुख्यमंत्रीपदी नव्या चेहऱ्याला संधी दिली. भाजपाच्या येथील यशाचं श्रेय हे कार्यकर्त्यांना दिलं जातं. अशाच एका कार्यकर्त्याची शपथपूर्ती आज झाली.
माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष रामदास पुरी यांना नवीन शूज घेऊन पायात घालण्यास सांगितले, आणि पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याची वचनपूर्ती झाली. शिवराज सिंह चौहान यांनी अनुप्पूर जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष रामदास पुरी यांच्या पायात आपल्या हातानं बूट घातले. कारण, पुरी यांनी सहा वर्षांपूर्वी एक संकल्प केला होता. त्या संकल्पाची पूर्तता झाल्यानं त्यांच्यात असलेल्या कार्यकर्त्याच्या समर्पण भावनेचा आदर करत माजी मुख्यमंत्र्यांनी सन्मानार्थ ही कृती केली.
अन्नुपूर येथील रामदास पुरी यांनी सहा वर्षांपूर्वी म्हणजेच राज्यात काँग्रेसची सत्ता असताना सन २०१७-१८ मध्ये संकल्प केला होता. जोपर्यंत मध्य प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता येत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. त्यानंतर, राज्यातील राजकीय फुटाफुटीतून भाजपाचं सरकार आलं होत. पण, नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतरच रामदास पुरी यांनी आपला संकल्प सोडला. गत महिन्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. काँग्रेसच्या कमलनाथ सरकारचा पराभव करत भाजपनं पुन्हा मध्य प्रदेशात सत्ता स्थापन केली. त्यामुळे, पुरी यांची संकल्पपूर्ती झाली, तर पक्षाचा कार्यकर्ता एवढा समर्पक भावनेने काम करतो, म्हणून माजी मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने त्यांना बुट घातले.
दरम्यान, सोशल मीडियावर सध्या शिवराजसिंह चौहान यांचा हा पायात बुट घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, रामदास पुरी यांच्या पायात शिवराजसिंह चौहान बुट घालत आहेत, शेजारी भाजपा पदाधिकारी दिसून येत आहेत.