काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जबलपूर येथून विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानाला सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या भाषणामधून जनतेला ६ आश्वासने दिली आहेत. त्यामध्ये मोफत वीज, जुनी पेन्शन योजना, स्वस्त सिलेंडर आधींचा समावेश आहे. या माध्यमातून काँग्रेसने तरुण, महिला, शेतकरी यांच्यासह अन्य घटकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, जर जनतेने काँग्रेसला आशीर्वाद दिला तर त्यांचा पक्ष सत्तेत आल्यावर लगेच सर्व आश्वासनांची पूर्तता करेल. कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर सर्व आश्वासनांची तातडीने पूर्तता करण्यात आली, याचं उदारण त्यांनी दिलं.
निवडणुकीच्या प्रचार मोहिमोची सुरुवात करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, जर राज्यात काँग्रेसची सत्ता आली तर जनतेला १०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. त्याशिवाय २०० यूनिटपर्यंतच्या विजेच्या वापरावर केवळ अर्ध बिल घेतलं जाईल. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार सत्तेवर आल्यास घरगुती सिलेंडर ५०० रुपयांमध्ये दिला जाईल. तर महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील, असं आश्वासनही प्रियंका गांधी यांनी दिलं आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी यावेळ जुन्या पेन्शन स्कीमबाबतही मोठं आश्वासन दिलं. त्यांनी सभेला संबोधित करताना मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार सत्तेवर आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली जाईल, असं आश्वासनही दिलं. जिथे जिथे काँग्रेस सरकार सत्तेवर आलं आहे तिथे तिथे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे, असंही प्रियंका गांधी यांनी आवर्जुन सांगितलं.