"बारावीला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 05:55 PM2023-07-10T17:55:06+5:302023-07-10T18:03:19+5:30

मध्य प्रदेश सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनवण्यासाठी ह्या योजनेची सुरुवात केली आहे.

"Free laptop for students with more than 70 percent marks in 12th", Says CM Shivrajsingh Chauhan in Madhya Pradesh | "बारावीला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप"

"बारावीला ७० टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप"

googlenewsNext

भोपाळ - केंद्र आणि राज्य सरकारकडून महिला वर्गासाठी नवनवीन योजना राबवण्यात येत असतात. नुकतेच केंद्र सरकारच्या बजेटमध्येही महिलांसाठी काही विशेष योजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, महिलांसाठी मुदत ठेव रकमची योजनाही लागू करण्यात आलीय. तर, विविध राज्य सरकार वेगवेगळ्या योजना आणतात. आता, मध्य प्रदेश सरकारने महिलांना दरमहा १००० रुपये देण्याची योजना सुरू केलीय. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याहस्ते आज मध्य प्रदेशात 'लाडली बहन योजना' सुरू झाली असून लाभार्थी महिलांना पैशाचे वाटपही करण्यात आले. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात चौहान यांनी १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणाही केली.

मध्य प्रदेश सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत बनवण्यासाठी ह्या योजनेची सुरुवात केली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार, महिलांना दरमहा १ हजार रुपये रक्कम थेट अकाऊंटवर मिळणार आहे. धार जिल्ह्यातील मोहनखेडा येथे लाडली बहन योजनेचं महासंमेलन भरवण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री चौहान यांनी १२ वी पास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या.  

मी मुला-मुलींनाही मदत करणार, कारण तेही माझे भाच्चे आहेत. म्हणून मी आज घोषणा करतो की, ज्या विद्यार्थ्यांना १२ वीच्या परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत, त्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येतील. २६ जुलै रोजी हा कार्यक्रम राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. तसेच, बारावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या मुलास आणि मुलीस तुमचा मामा स्कुटी देणार, तसेच ५ वी आणि ९ वीच्या शिक्षणासाठी गाव सोडून दुसऱ्या गावात जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदी करण्यासाठी साडे चार हजार रुपयांचा निधी दिला जाईल, असेही चौहान यांनी सांगितले. 

दरम्यान, आज मध्य प्रदेशमधील १.२५ कोटींपेक्षा अधिक महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या महिलांच्या खात्यात १-१ हजार रुपयांचा दुसरा हफ्ता पाठविण्यात आला आहे. २५ जुलैपासून पुन्हा एकदा या योजनेसाठी महिलांचे अर्ज भरुन घेतले जाणार आहेत.  

 

लाडली बहन योजना कुणासाठी?

केवळ मध्य प्रदेशच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल
अर्ज करण्यासाठी महिलांचे वय २३ वर्षांपेक्षा कमी आणि ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे
शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
ही विशेष योजना केवळ इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील महिलांसाठीच आहे
१० जूनपासून या योजनेतून थेट बँकेत पैसे जमा होणार आहेत
अर्ज जमा करुन घेण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम गावोगावी जाईल. 

अर्जासाठी काय लागतील कागदपत्रे

१. आधार कार्ड
२. पासपोर्ट साइज  फोटो
३. बँक खातेची डीटेल्स
४. मोबाइल नंबर
५. रहिवाशी दाखला
६. जन्म दाखला

Web Title: "Free laptop for students with more than 70 percent marks in 12th", Says CM Shivrajsingh Chauhan in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.