मध्य प्रदेशमधील सर्वात ज्येष्ठ आमदार गोपाल भार्गव यांना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील जाणकार आणि भार्गव यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. आता पुढे काय होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर आता गोपाळ भार्गव यांनी स्वत: पुढे येत दिलं आहे. तसेच पुढील रणनीतीही सांगितली आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये नवव्यांदा आमदार बनल्याचा उल्लेख केला आहे. तसेच राज्यभरात समाजाला संघटित केल्याचाहऊ उल्लेख केला आहे.
मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील रहली विधानसभा मतदारसंघातील आमदार गोपाल भार्गव यांनी फेसबूकवरून आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, आज मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळाची घोषणा झाली. मी नवनियुक्त मंत्र्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो. आज राज्यभरातील माझे समर्थक माझा मंत्रिमंडळात समावेश का झाला नाही, अशी विचारणा करत आहेत. मी त्यांना सांगितलं की, ४० वर्षांच्या दीर्घ राजकीय प्रवासात आतापर्यंत पक्षाने ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्यांचं समर्पिक भावनेने निर्वहन केलं आहे. तसेच पुढेही ते करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या स्थापनेबाबत पक्षाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. पद येत जात राहतं. पण जनतेचा विश्वास कायम असतो. एवढी वर्षे मी माझ्या मतदारसंघात आणि राज्यात जी सेवा केली आहे, तो माझा ठेवा आणि वारसा आहे. माझ्या मतदारसंघाने मला सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे. ही बाब देशात दुर्मीळ आहे. यावेळी मतदारांनी मला ७० टक्के मतं आणि ७३ हजारांच्या मताधिक्यासह विजय मिळवून दिला. हे माझ्यावर ऋण आहे. मी जोपर्यंत या मतदारसंघाचा आमदार आहे, तोपर्यंत मी या भागासाठी काही कमी पडू देणार नाही. राजकीय पक्षांचे स्वत:चे फॉर्म्युले असतात. सामाजिक, प्रादेशिक कारणं असतात. त्याच्या खोलात जाण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे मी गप्प आहे. आता मोकळ्या वेळाचा वापर मी समाजाला संघटित करून समाजोद्धारासाठी करणार आहे. दरम्यान, काही वेळातच भार्गव यांनी मूळ पोस्ट एडिट केली होती.
मध्य प्रदेशच्या सोळाव्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असलेल्या गोपाल भार्गव यांनी सागर जिल्ह्यातील रहली मतदारसंघातून सलग नवव्यांदा विजय मिळवला आहे. भार्गव हे १९८५ पासून सातत्याने विजय मिळवून विधानसभेत पोहोचत आहेत.