हृदयद्रावक! ७ जणांनी पत्नीची छेड काढून केली मारहाण, पतीने दोन मुलांसह संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 16:23 IST2024-03-05T16:23:27+5:302024-03-05T16:23:50+5:30
Crime News: मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, येथे एका पित्याने त्याची १२ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांच्या मुलग्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली. तिघांचेही मृतदेह एका आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले.

हृदयद्रावक! ७ जणांनी पत्नीची छेड काढून केली मारहाण, पतीने दोन मुलांसह संपवलं जीवन
मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, येथे एका पित्याने त्याची १२ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांच्या मुलग्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली. तिघांचेही मृतदेह एका आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. ही घटना शामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुंडी गावात घडली आहे. जिथे बंजारा समाजातील तरुणाने त्याच्या दोन मुलांसह जीवन संपवलं. मृत्यूपूर्वी या तरुणाने आपल्यासोबत घडलेल्या घटनांचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे.
मृताने सुसाईड नोटमध्ये लिहिले की, तीन महिन्यांपूर्वी माझी पत्नी नैनी बंजारा हिला गावातील राजू, कालू, सोनू, गीताबाई, नोजीबाई, लीलाबाई आणि गोविंद यांनी मारहाण केली, तसेच तिची छेड काढली. मृत पित्याने या सर्व लोकांना आपल्या आणि आपल्या मुलांच्या मृत्यूला जबाबदार ठरवले आहे. या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृत पित्याने सुसाईड नोटमधून केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृताच्या पत्नीची गावातीलच एका कुटुंबातील महिला आणि पुरुषांनी मारहाण करून छेड काढल्याने हा तरुण दु:खी झाला होता. मागच्या रविवारी तो संध्याकाळी मुलांना भेटण्यासाठी तीन महिन्यांनंतर घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने मुलांना शामगड येथे नेऊन शॉपिंग केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी तिघांचेही मृतदेह गावातील एका झाडाला लटकलेल्या स्थितीत सापडले.
या तिघांचेही मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर मृताची पत्नी आणि कुटुंबीय घटनास्थळी आले. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी आरोपींविरोधात कारवाईची मागणी केली. त्यानंतर संतप्त लोकांनी आरोपींच्या घरावर चाल केली. तसेत तिथे जाऊन मोडतोड केली. या जमावाची पोलिसांसोबतही बाचाबाची झाली. घटनास्थळावर असलेल्या पोलिसांनी जमावाला कसेबसे शांत केले आणि तिन्ही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवले.