भोपाळ - मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्यात ह्रदयद्रावक घटना घडली आहे. सैन्यातील जवानाचा अपघाती मृत्यू झाला. एक दिवस अगोदर या जवानाच्या पत्नीने बाळाला जन्म दिला होता. त्या बाळाला आणि पत्नीला भेटण्यासाठी जात असतानाचा जवानाचा मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी सायंकाळी सामाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघाताची ही घटना घडली.
सैन्यातील जवान आपल्या पत्नी आणि बाळाला भेटण्यासाठी सुट्टी घेऊन गावी निघाला होता. त्यांची पत्नी संजय गांधी रुग्णालयात तिने एक दिवस अगोदरच बाळाला जन्म दिला होता. यादरम्यान, पत्नी व बाळाला वाहून जवान रुग्णालयातून घराकडे जात होता. त्यावेळी, दुचाकीवरील नियंत्रण सुटले व एका ट्रकला जाऊन त्याची बाईक धडकली. या घटनेनंत स्थानिकांसह पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या जवानास संजय गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला.
मृत्यूमुखी पडलेला सैन्यातील जवान हा रिवा जिल्ह्यातील बदगाव गावचा रहिवाशी होता. सनी पटेल असं या जवानाचं नाव असून तो आसाममध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. पत्नीने मुलाला जन्म दिल्यामुळे तो सुट्टी घेऊन गावी आला होता. घरात बाळ आल्याने सर्वांनाच आनंद झाला होता. घरी आणि गावात आनंदाचे वातावरण असतानाच क्षणार्धात ही दु:खद घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळही व्यक्त होत आहे.
दरम्यान, सनी पटेल सामान ठाणे हद्दीत आल्यानंतर बस स्टँडजवळून दुचाकी चालवत असताना अचानक एक गाय समोर आली. या गाईला वाचविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी गाडी वळताच शेजारी असलेल्या ट्रकला धडकली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक आणि बाईकची जोराची धडक बसली. या अपघातामध्ये सनी पटेल गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सनी पटेल यांच्या पार्थिवावर सैन्य दलातील पद्धतीनुसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, सैन्यातील अधिकारी, स्थानिक प्रशासन व पोलीस अधिकारीही अंत्यसंस्काराला उपस्थित होते.