मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. त्यातच राज्यातील सत्ताधारी भाजपा आपल्या विरोधातील लाट थोपवून विजय मिळवण्यासाठी वेगवेगळी समिकरणं जुळवत आहेत. यादरम्यान, काही आमदारांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याचदरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे सिंधिया स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या समर्थकांची तिकिटं कापली गेली.
भाजपाने उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध करताना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या काही कट्टर समर्थकांची तिकिटं कापली आहेत. ज्यांची तिकिटं कापण्यात आली आहेत. त्यामध्ये एका मंत्र्यांचाही समावेश आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी ग्वाल्हेरमधील किल्ल्यामध्ये असलेल्या सिंधिया स्कूलचा १२५ व्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे सुद्धा उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेताना डान्सही केला होता.
मात्र याचदरम्यान, भाजपाने आपली उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध केली. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे पाचव्या यादीमध्ये भाजपाने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या दोन कट्टर समर्थकांचं तिकीट कापलं. त्यात पहिलं तिकीट हे मेहगांव विधानसभा मतदारसंघातील आमदार ओ.पी.एस. भदौरिया यांचं होतं. भदौरिया हे शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये मंत्री आहेत. तर दुसरं तिकीट हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या मुन्नालाल गोयल यांचं होतं. दरम्यान, तिकीट न मिळाल्याने शिंदे यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडालेली आहे.