"मी देशाच्या सुरक्षेची हमी देतो, पण विरोधक अपशब्द वापरतात"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 06:05 IST2024-04-10T06:05:04+5:302024-04-10T06:05:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर घणाघाती टीका

"मी देशाच्या सुरक्षेची हमी देतो, पण विरोधक अपशब्द वापरतात"
भोपाळ : विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे घटक पक्ष भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्याचे काम करत आहेत आणि देशाचा विकास रोखण्यासाठी आपल्याला अपशब्द वापरून धमक्या देत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. आगामी लोकसभा निवडणुका हे नवीन भारत घडवण्याची मोहीम आहे, असे सांगत मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात एका प्रचारसभेत मोदी यांनी सत्ताधारी एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी जनतेचे आशीर्वाद मागितले.
"जेव्हा मी देशाच्या सुरक्षेची हमी देतो, तेव्हा ते मला अपशब्द वापरतात, जेव्हा मी कलम ३७० (जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे) हटवण्याची गॅरंटी पूर्ण करताे, तेव्हा ते मला पाकिस्तानच्या भाषेत अपशब्द बोलतात. आपण भगवान महाकालचे भक्त असून कोणालाही घाबरत नाही,” असे पंतप्रधान म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी तामिळनाडूमधील चेन्नईत ‘रोड शो’ घेतला. यावेळी त्यांनी पांढरा शर्ट आणि पारंपरिक 'वेष्टी' (धोती) आणि 'अंगवस्त्रम' (शाल) परिधान केला हाेता.