मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे. भाजपाकडून राज्यातील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर काँग्रेसने भाजपाचा पाडाव करून मध्य प्रदेशमधील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, येथील प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींपर्यंत पोहचल्या आहेत. सतना येथील प्रचारसभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान रोज लाखोंचा सुट घालतात. मात्र मी केवळ पांढरा टी-शर्ट परिधान करतो, असे राहुल गांधी म्हणाले.
एका प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींची भाषणं ऐकली आहेत. ते प्रत्येक ठिकाणी सांगतात की, मी ओबीसी समाजातील आहे. ते वारंवार हे सांगून पंतप्रधान बनले. एका दिवसामध्ये ते किमान एक सूट परिधान करतात. त्यांच्या सूटची किंमत ही लाखो रुपये असते. तुम्ही मोदींना त्यांचे कपडे पुन्हा परिधान केलेले पाहिलं आहे का? मी हे एकच पांढर शर्ट घातलं आहे. तुम्हाला माहिती आहे का? की मी जातीआधारिर जणगणनेबाबत बोलण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्यांच्या भाषणातून जात गायब झाली आहे. आता मोदी भारतात कुठलीही जात नाही म्हणून सांगत आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
राहुल गांधींनी पुढे सांगितले की, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यावर पहिलं पाऊल हे जातीआधारित जनगणना करण्यासाठी उचललं जाईल. आमचा पक्ष जसा सत्तेत येईल, तशी आम्ही देशभरात जातीआधारित जनगणना करू. अशी जनगणना झाली नाही तर मागास वर्ग योगदान देऊ शकणार नाही. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये प्रचारावेळी माझी भेट काही शेतकऱ्यांशी झाली होती. मी त्यांना जमिनीचा भाव विचारला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना जमिनीचा भाव माहितच नव्हता.
सरकार गरिबांकडून जीएसटी घेऊन सगळा पैसा उद्योगपतींना देत आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, मोठे उद्योगपती रोजगार देत नाहीत. छोटे व्यापारी जे लहान आणि मध्यम व्यवसाय चालवतात, जे दुकानं चालवतात. ते लोक रोजगार निर्माण करतात. लाखो छोटे विभाग होते जे रोजगार द्यायचे. मात्र भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेल आले आणि त्यांनी या विभागांवर हल्ला केला. त्यांनी नोटाबंदीच्या माध्यमातून व्यापारी आणि मध्यम व्यवसायांवर हल्ला केला. या गोष्टी छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्यासाठी एक हत्यार सिद्ध झाले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.