भाजपाने ५० जागा जिंकल्या तर..., काँग्रेस आमदार शब्द पाळणार, स्वत:चं तोंड काळं करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 12:58 PM2023-12-05T12:58:31+5:302023-12-05T12:59:06+5:30
Madhya Pradesh Assembly Election Result 2023: मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यातील भांडेर मतदारसंघातून विजय मिळवणारे काँग्रेस आमदार फूल सिंह बरैय सध्या इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आलेले आहेत
मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यातील भांडेर मतदारसंघातून विजय मिळवणारे काँग्रेसआमदार फूल सिंह बरैय सध्या इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आलेले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात केलेल्या विधानावर आपण ठाम असल्याचे आणि सांगितल्यानुसार स्वत:च स्वत:चं तोंड काळं करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचं झालं असं की, काँग्रेस नेते फूलसिंह बरैया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचे ५० आमदार निवडून आले तर स्वत:चं तोंड काळं करणार असल्याचं सांगताना दिसत आहेत. मात्र ३ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला १६० हून अधिक जाग मिळाल्या असून, काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्यानंतर आता फूल सिंह बरैया हे खरोखरच आपलं तोंड काळं करणार का? अशी चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना फूलसिंह बरैया यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्यासं स्पष्ट केलं. तसेच ७ डिसेंबर रोजी भोपाळमधील राजभवनासमोर दुपारी २ वाजता आपण स्वत:च्या हाताने स्वत:चं तोंड काळं करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच फूल सिंह बरैया यांनी ईव्हीएमवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, टपाली मतपत्रिकांच्या मतमोजणीमध्ये काँग्रेस आघाडीवर होती. मात्र ईव्हीएममधील मतांची मतमोजणी सुरू झाल्यावर भाजपा पुढे गेला. ईव्हीएमद्वारे होणारं मतदान बंद झालं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.