‘लाडली’ची लाट, कमळाला साथ; मध्य प्रदेशात भाजपाला EXIT पाेलपेक्षा अधिक दणदणीत यश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 05:50 AM2023-12-04T05:50:17+5:302023-12-04T05:51:31+5:30

सर्व राजकीय आडाखे फाेल ठरवित मिळविले प्रचंड बहुमत, २० वर्षांमध्ये पाचव्यांदा राज्यात भाजपचे सरकार हाेणार स्थापन

In Madhya Pradesh, BJP's success is more resounding than the EXIT panel | ‘लाडली’ची लाट, कमळाला साथ; मध्य प्रदेशात भाजपाला EXIT पाेलपेक्षा अधिक दणदणीत यश

‘लाडली’ची लाट, कमळाला साथ; मध्य प्रदेशात भाजपाला EXIT पाेलपेक्षा अधिक दणदणीत यश

अभिलाष खांडेकर

भाेपाळ : मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेस यांच्यात कडवी झुंझ हाेणार असल्याचे बाेलले जात हाेते. मात्र, भाजपने सर्व आडाखे फाेल ठरवीत जाेरदार मुसंडी मारली. पंतप्रधान नरेंद्र माेदींची गॅरंटी आणि ‘लाडली बहना’च्या लाटेने शिवराजसिंह सरकारला निवडणुकीच्या रेसमध्ये ४० पेक्षा जास्त जागा जिंकवून दिल्या. २०१८ मधील निवडणुकीचा अपवाद वगळता सलग पाचव्यांदा मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येणार आहे.
बहुतांश एक्झिट पाेलने मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत हाेणार असल्याचे म्हटले हाेते. भाजप कदाचित काठावर पास हाेईल, अशी शक्यता वर्तविली हाेती. मात्र, मतमाेजणीच्या दिवशी मतदान यंत्रे उघडल्यानंतर हळूहळू जे चित्र समाेर आले, त्याने सर्वांनाच चकित केले. भाजपने काठावर नव्हे तर, प्रावीण्य मिळविले. 

ॲंटि-इन्कम्बन्सीला खाे
राज्यात ‘मामा’ म्हणून शिवराजसिंह चाैहान यांचा आदराने उल्लेख केला जाताे. त्यांची १८ वर्षांपासून राज्यात सत्ता आहे. राज्यात ॲंटि-इन्कम्बन्सीचे वातावरण असल्याची चर्चा हाेती. मात्र, ‘लाडली बहना’च्या जाेरावर त्यांनी पूर्ण वातावरणच फिरवून दिले. 

हिंदुत्वाचा फॅक्टरही ठरला महत्त्वाचा
मध्य प्रदेशात काॅंग्रेसला देखील साॅफ्ट हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागला. मात्र, प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली त्यावेळी मतदारांनी भाजपच्या हिंदुत्वाची निवड केली. राज्यातील मंदिरांचे चित्र बदलले आहे. उज्जैन मधील महाकाल धामसारखा विकास इतर धार्मिक स्थळांवर हाेत आहे.
सलकनपूर मध्ये देवीलाेक, ओरछामध्ये रामलाेक, सागर येथे रविदास स्मारक आणि चित्रकूटमध्ये दिव्य वनवासी लाेक यासारख्या याेजना राबविण्यात येत आहे, मतदारांनी त्यास पसंती दिली आहे.

डझनभर मंत्र्यांना जनतेने पाठवले घरी

भाजपने १६० पेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता कायम राखली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांच्यासह काही मंत्री विजयी झाले. मात्र, काही मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यात गृहमंत्री नराेत्तम मिश्रा यांच्यासह काही दिग्गजांचा समावेश आहे. दातिया येथून नराेत्तम मिश्रा रिंगणात हाेते. त्यांचा काॅंग्रेसचे राजेंद्र भारती यांनी पराभव केला. आदिवासी कल्याण मंत्री मीणासिंह यांचा मानपूर येथून काॅंग्रेसचे तिलकराज सिंह यांनी पराभव केला. कृषिमंत्री कमल पटेल यांना हरदा येथून काॅंग्रेसचे रामकिशाेर डाेगने यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

बमाेरी येथून पंचायत राज व ग्रामविकास मंत्री महेंद्रसिंह सिसाेदिया यांचा पराभव झाला. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री प्रेमसिंह पटेल हे बडवानी येथून पराभूत झाले. अटेर येथून सहकार मंत्री अरविंद भदाेरिया हे पराभूत झाले. पाेहरी येथून मंत्री सुरेश धाकड यांचाही पराभव झाला.

‘आप’ला एकही जागा नाही
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये ‘आप’चा एकही उमेदवार विजयी झाला नाही. पक्षाने २०० पेक्षा जास्त जागांवर उमेदवार दिला हाेता. मात्र, अनेक उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले. 

Web Title: In Madhya Pradesh, BJP's success is more resounding than the EXIT panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.