भोपाळ/रायपूर : मध्य प्रदेशात २३० सदस्यांच्या विधानसभेसाठी शुक्रवारी ७३.०१ टक्के मतदान झाले. नक्षलग्रस्त बालाघाट, मांडला आणि दिंडोरी जिल्ह्यांत दुपारी ३ वाजता मतदान संपले, तर राज्याच्या इतर भागांत ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते. दरम्यान, पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्या बंदोबस्तात छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यांत ७० मतदारसंघात शुक्रवारी ६८.१५ टक्के मतदान झाले. मध्य प्रदेशात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यामुळे मतदानाला गालबोट लागले.
सुरक्षा दलाच्या जवानांना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाठीमार व गोळीबारही करावा लागला. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दाेन्ही राज्यांमध्ये यावेळी मतदानाचे प्रमाण गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घटले आहे. प्रशासनाने यावेळी माेठ्या प्रमाणात जनजागृती केली. विविध उपक्रमही राबविले. मात्र, मतदानाचा टक्का घटला. मध्य प्रदेशात गेल्यावेळी ७५.६३ टक्के तर, छत्तीसगडमध्ये ७६.३५ टक्के मतदान झाले हाेते. घटलेल्या फटका बसताे आणि काेणाला फायदा हाेताे, हे ३ डिसेंबरला मतमाेजणीला कळेल.
नक्षलग्रस्त भागात जास्त मतदानमध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहर येथे ८०.३८ टक्के, लांजी येथे ७५ टक्के आणि परसवाडा येथे ८१.५६ टक्के मतदान झाले.
मध्य प्रदेशात हिंसाचाराचे गालबाेटइंदूरमध्येही काही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पाेलिसांना बलप्रयाेग करावा लागला. याशिवाय महू जिल्ह्यात दाेन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत तलवारीने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. त्यात दाेन जण जखमी झाले. याशिवाय छतरपूर जिल्ह्यात राजनगर येथील काॅंग्रेसचे उमेदवार विक्रम सिंह यांनी आपल्या एका समर्थकाची विराेधी पक्षाने हत्या केल्याचा आराेप केला आहे.