लघुशंकेसाठी ‘वंदे भारत’मध्ये गेला अन् लटकला, उज्जैनलाच पोहोचला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 05:59 AM2023-07-21T05:59:29+5:302023-07-21T06:00:10+5:30
ऑटोमॅटिक लॉकमुळे त्याला दरवाजेही न उघडता आल्याने तो थेट उज्जैनला पाेहोचला.
मध्य प्रदेशमधील विचित्र घटना सध्या चर्चेत आहे. भोपाळ रेल्वे स्थानकावर उभ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये लघुशंकेसाठी गेलेली व्यक्ती ट्रेनमध्येच अडकली. त्यामुळे त्याचे कुटुंबीयही भोपाळ स्थानकावरच लटकले; कारण त्याच्याकडेच दुसऱ्या ट्रेनद्वारे पुढील प्रवासाची तिकिटे होती.
सिंगरौलीतील रहिवासी अब्दुल कादिर (३२) पत्नी आणि ८ वर्षांच्या मुलासह दक्षिण एक्स्प्रेसने हैदराबादहून सिंगरौलीकडे निघाले होते. १५ जुलै रोजी सायंकाळी ५:२० वाजता ते भोपाळ स्टेशनवर पोहोचले. त्यानंतर ८:५५ वाजता सिंगरौलीला जाणारी ट्रेन पकडायची होती. इतक्यात अब्दुलला लघुशंका आल्याने तो दुसऱ्या फलाटावर उभ्या ‘वंदे भारत’च्या शौचालयात गेला. तो बाहेर येईपर्यंत ट्रेन सुरू झाली. ऑटोमॅटिक लॉकमुळे त्याला दरवाजेही न उघडता आल्याने तो थेट उज्जैनला पाेहोचला.
टीटीने भोपाळ ते उज्जैनचे १,०२० रु. भाडे वसूल केले. मग, अब्दुल भोपाळहून उज्जैनला बसने गेला. त्यासाठी ७५० रुपये मोजले. दुसरीकडे सिंगरौलीला जाणारी ट्रेन चुकली. त्यामुळेही चार हजार रुपयांचे नुकसान झाले. अशा प्रकारे सुमारे ६ हजार रुपयांचा फटका बसला.