ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 08:58 PM2024-04-24T20:58:08+5:302024-04-24T21:00:34+5:30
"काही मांध्यमांतील वृत्तांनुसार, इंडी अलायन्स 'वन इयर, वन पीएम' फॉर्म्युला तयार करत आहे. अर्थात पहिल्या वर्षात एक पीएम, दुसऱ्या वर्षी दुसरा पीएम, तिसऱ्या वर्षी तिसरा पीएम, चौथ्या वर्षी चौथा पीएम, पाचव्या वर्षी पाचवा पीएम. आपणच सांगा देशाचे काय होणार? देश टिकेल का?"
हे लोक (I.N.D.I.A.) पंतप्रधान पदाच्या खुर्चीचाही लिलाव करण्याच्या तयारीत आहेत आणि 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करत आहेत. अर्थात दर वर्षी एक नवा पंतप्रधान. एक वर बसेल आणि चार लोक खुर्चीचे पाय पकडून खाली बसतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या I.N.D.I.A. वर जोरदार प्रहार केला आहे. ते मध्यप्रदेशातील बैतूल येथील प्रचारसभेत बोलत होते.
सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, 'आपला आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. जनता-जनार्दन हे परमेश्वराचे रूप आहे आणि जनता-जनार्दन जेव्हा आशीर्वाद देते तेव्हा तो साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद असतो. आजकाल आशीर्वाद देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कमळाचे बटण दाबून मोदींना आशीर्वाद द्या. आपल्या एका मताने भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. आपल्या एका मताने परदेशात भारताचा डंका वाजला. आपल्या एका मताने सीमेवर डोळे वटारून बघणाऱ्या शत्रूला धडा शिकवला. आपल्या एका मताने 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येतील भव्य मंदिरात रामललांची प्रतिष्ठापना झाली.'
'ते' पंतप्रधान पदाच्या खुर्चीचा लिलाव करण्यात व्यस्त -
विरोधकांच्या I.N.D.I.A. वर हल्ला चढवताना मोदी म्हणाले, "आपल्याला एक गोष्ट ऐकूण हसायला येईल आणि भीतीही वाटेल. काही मांध्यमांतील वृत्तांनुसार, इंडी अलायन्स 'वन इयर, वन पीएम' फॉर्म्युला तयार करत आहे. अर्थात पहिल्या वर्षात एक पीएम, दुसऱ्या वर्षी दुसरा पीएम, तिसऱ्या वर्षी तिसरा पीएम, चौथ्या वर्षी चौथा पीएम, पाचव्या वर्षी पाचवा पीएम. आपणच सांगा देशाचे काय होणार? देश टिकेल का? आपली स्वप्न टिकतील का? आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित राहील का? ही पंतप्रधान पदाच्या खुर्चीचा लिलाव करण्यात व्यस्त आहेत."
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प -
तत्पूर्वी, सागर येथील एका प्रचार सभेत बोलताना मोदी म्हणाले, "आज काँग्रेसचे एक असे सत्य देशासमोर आले आहे, जे ऐकून देशातील प्रत्येक नागरिक अवाक झाला आहे. धर्माच्या आधारावर कुणालाही आरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे आपल्या संविधानात स्पष्टपणे नमूद आहे. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः धर्माच्या आधारावर आरक्षणाच्या विरोधात होते. मात्र, काँग्रेसने काही वर्षांपूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प केला होता. ते अपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेलत आहेत."
OBC चा हक्क हिसकावून मुस्लिमांना दिला -
पीएम मोदी म्हणाले, "गेल्या वेळी कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण दिले होते. यासाठी काँग्रेसने मागच्या दाराने आणि बेकायदेशीरपणे चलाखी केली होती. ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा गुन्हा काँग्रेसने केला होता. यासाठी त्यांनी मुस्लिमांच्या सर्व जातींना ओबीसी कोट्यात टाकले आहे. असे करून त्यांनी ओबीसींचे मोठे अधिकार हिरावून घेतले आणि धर्माच्या आधारावर दिले. हाच फॉर्म्युला संपूर्ण देशात लागू करण्याची काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेस OBC प्रवर्गाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्यांनी OBC समाजाचा हक्क हिरावला आहे. काँग्रेसने सामाजिक न्यायाची हत्या केली आहे. संविधानाचा अनादर केला आहे आणि बाबासाहेबांचाही घोर अपमान केला आहे."