इंदूर: मागील काही काळापासून हर्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशाप्रकारच्या घटनांचे व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात. ताजे प्रकरण मध्य प्रदेशच्या इंदूरमधून समोर आले आहे. एमपीपीएससीची तयारी करणारा करणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचा वर्गातच हृदयविकाराच्या घटक्याने मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भंवरकुआन येथील कोचिंग सेंटरमधली आहे. राजा लोधी(18) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सागर येथील रहिवासी असून, इंदूरमध्ये भाड्याने खोली करुन राहायचा. राजाला अधिकारी व्हायचे होते, यासाठी तो इंदूरमध्ये एमपीपीएससीची तयारी करायचा. 17 जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे कोचिंगला गेला. दुपारपर्यंत पूर्णपणे बरा होता. पण, वर्गात अचानक त्याला छातीत दुखू लागले.
अवघ्या काही वेळात राजा खाली पडला. यानंतर त्याच्या मित्रांनी घाईघाईने त्याला दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, त्या विद्यार्थ्याच्या घरात शोककळा पसरली आहे.