Indore Lok sabha Election Result 2024: इंदूर : देशभरात लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे संपल्यानंतर आज मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, सर्वांच्या नजरा मध्य प्रदेशातील इंदूरच्या जागेवर लागल्या आहेत. दरम्यान, याठिकाणी 'नोटा'ला (NOTA) आतापर्यंत सर्वाधिक मते मिळाली आहेत. यासह इंदूरमधील 'नोटा'ने बिहारमधील गोपालगंजचा पूर्वीचा विक्रम मोडला आहे. आतापर्यंत 'नोटा'ला ९०, २५७ मते मिळाली आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारच्या गोपालगंज जागेवर 'नोटा'ला सर्वाधिक मते मिळाली होती. त्यावेळी या मतदारसंघातील ५१६६० मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला होता. त्यामुळे एकूण मतांपैकी जवळपास पाच टक्के मते 'नोटा'च्या खात्यात गेली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देशातील निवडणूक प्रक्रियेत सप्टेंबर २०१३ मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये 'नोटा' बटण समाविष्ट करण्यात आले होते.
भाजपाचा उमेदवार आघाडीवरमध्य प्रदेशातील इंदूर मतदारसंधातील आतापर्यंत हाती आलेल्या कलांबाबत बोलायचे झाल्यास खासदार आणि भाजपा उमेदवार शंकर लालवानी हे त्यांचे प्रतिस्पर्धी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार संजय सोलंकी यांच्यापेक्षा ३,६०,५४६ मतांनी पुढे आहेत. येथे भाजपाचे उमेदवार लालवानी यांना आतापर्यंत एकूण ५,२४, ३२० मते मिळाली आहेत. यासह या जागेवर लालवानी यांची विक्रमी विजयाकडे वाटचाल सुरू असून, या जागेवर एकूण १४ उमेदवारांमध्ये निवडणूक लढत आहे.
काँग्रेसच्या उमेदवाराने घेतला होता अर्ज मागेदरम्यान, इंदूरमधील काँग्रेसचे घोषित उमेदवार अक्षय कांती बम यांनी २९ एप्रिल रोजी अर्ज मागे घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसला होता. अक्षय कांती बम यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर लगेचच त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे या जागेच्या ७२ वर्षांच्या इतिहासात काँग्रेस प्रथमच निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडली होती. यानंतर काँग्रेसने ईव्हीएमवर 'नोटा' बटण दाबून स्थानिक मतदारांना भाजपला धडा शिकवण्याचे आवाहन केले होते.