मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबा खाणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. आंबा खाल्ल्यानंतर एका महिलेची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इंदूरच्या राजेंद्र नगर पोलीस स्टेशनच्या बिजलपूरची आहे. अर्चनाने जेवणानंतर आंबे खाल्ले होते. यानंतर अचानक तिची प्रकृती ढासळू लागली. डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या. बराच वेळ होऊनही तिचा त्रास कमी न झाल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. जिथे तिचा मृत्यू झाला.
अर्चनाचे सासरे बन्सीलाल अटेरिया यांनी सांगितलं की, आंबे खाल्ल्यानंतर अर्चनाचं डोकं खूप दुखायला लागलं होतं. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिचं बीपी सतत कमी होत होतं. याचदरम्यान अचानक तिचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, यापूर्वी गावातील अनेक लोक आंबे खाल्ल्याने आजारी पडत होते.
पोलीस अधिकारी राघवेंद्र सिंह चौहान यांनी सांगितलं की, अर्चना आंबे खाल्ल्यानंतर आजारी पडली होती. यानंतर कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.