इन्स्टाग्रामवर मित्र बनलेल्या एका तरुणाने एका नवविवाहितेचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्वाल्हेर येथील एका २१ वर्षांच्या विवाहितेची इन्स्टाग्रामवर दिल्लीतील एका तरुणाशी ओळख झाली होती. या तरुणाने तिला भेटण्यासाठी दिल्लीला बोलावले. त्यानंतर हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या दरम्यान, त्याने त्या विवाहितेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. तसेच ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेगवेगळ्या शहरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नाही तर आरोपी विवाहितेला ब्लॅकमेल करू लागला. अखेर कंटाळून विवाहितेने पोलिसांकडे तक्रार दिली. तसेच आता पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
ग्वाल्हेरमधील थाटीपूर परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय विवाहितेने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तिने सांगितले की, सुमारे वर्षभरापूर्वी तिचा विवाह झाला नव्हता. तेव्हा इन्स्टाग्रामवर तिची ओळख हरियाणामधील पलवल येथील रहिवासी असलेल्या दीपक जाटव याच्याशी झाली. मैत्री झाल्यानंतर दोघांमध्ये नियमितपणे बोलणं होऊ लागलं. याचदरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न लावून दिलं. त्यानंतर १४ मे रोजी दीपक याने तिला भेटण्यासाठी दिल्लीला बोलावलं. तेव्हा ही तरुणी पतीला काही न सांगता दीपकला भेटण्यासाठी दिल्लीमध्ये आली. तिथे दीपकने तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. दीपकने जवळपास आठवडाभर आपल्यासोबत ठेवले. तसेच तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
त्यानंतर दीपकने जून महिन्यात तिला पुन्हा एकदा भेटण्यासाठी बोलावले. यावेळीही दीपकने तिला हॉटेलमध्ये थांबवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर जुलै महिन्यात दीपकने विवाहितेला फोन करून पैशांची मागणी केली तसेच तिल्या धमक्या दिल्या. विवाहितेने दीपकला सांगितले की, तिच्याकडे पैसे नाही आहेत. त्यावर दीपकने विवाहितेला तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तेव्हा या तरुणीने आपल्याकडील दागिने गहाण ठेवून ३० हजार रुपये घेऊन दीपकला भेटण्यासाठी जयपूरला गेली. तिथेही दीपकने तिच्यावर अत्याचार केले.
त्यानंतर पैशांची भूक वाढलेला दीपक तिच्याकडे वारंवार पैसे मागू लागला. मात्र यावेळी तरुणीने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्याने सर्व व्हिडीओ या महिलेच्या पतीला पाठवले. अखेरीस या तरुणीने ग्वाल्हेरच्या एसपी ऑफिसमध्ये धाव घेत तक्रार दिली. आता पोलिसांनी आरोपी दीपकविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.