लोकमत न्यूज नेटवर्क, भाेपाळ: राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरच्या दिवशी काेणी शक्तिप्रदर्शन केले, तर काेणाची अखेरच्या क्षणापर्यंत धावपळ झाली. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे अशी स्थिती निर्माण झाली की, अनेक उमेदवार अगदी शेवटचे ५-१० मिनिटे असताना निवडणूक कार्यालयात पाेहाेचले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळची कमी गर्दीची वेळ निवडली. शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी बुदनी येथून अर्ज दाखल केला. भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांची मात्र फार दमछाक झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ वाजेपर्यंत मुदत असते. विजयवर्गीय २ वाजून ५१ मिनिटांनी निवडणूक कार्यालयात पाेहाेचले. ते सकाळीच गणेश मंदिरात दर्शन घेऊन निघाले हाेते. परंतु, रॅलीमुळे त्यांना खूप उशीर झाला. हीच गत त्यांचे प्रतिस्पर्धी रमेश मेंदाेला यांची झाली. त्यांना रॅलीतील गाडी साेडून दुसऱ्या वाहनाने धावपळ करीत पाेहाेचावे लागले.
जितू पटवारी धावले
काॅंग्रेसचे जितू पटवारी यांनी राऊ येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना ते धावतच गेले. विलंब हाेत असल्यामुळे ते धावतपळत गेल्याचे बाेलले जात हाेते. मात्र, ते फिटनेससाठी धावत गेले. प्रचारातही धावत गेले.
भाजप उमेदवाराने भरलाच नाही अर्ज
बालाघाट मतदारसंघात अखेरच्या क्षणी चित्र पालटले आहे. भाजपने माैसम बिसेन यांना उमेदवारी जाहीर केली हाेती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाच नाही. अखेर त्यांचे पिता गाैरीशंकर यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला. ऐनवेळी उमेदवार बदलल्यामुळे जाेरदार चर्चा सुरू आहे.