अभिलाष खांडेकर
भोपाळ : मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाची स्पर्धा तीव्र होत असताना एकेकाळचे जवळचे मित्र प्रतिस्पर्धी बनल्याचे दिसून येत आहे. राज्यात अनपेक्षितरीत्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकल्यानंतर भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे; परंतु निकालानंतर ४८ तासांनंतरही मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झालेले नाही.
शिवराजसिंह यांचे तरुणपणातील जिवलग मित्र कैलाश विजयवर्गीय यांनी चौहान यांच्या ‘लाडली बहना योजने’मुळे भाजप पुन्हा सत्तेत आल्याचा दावा फेटाळून लावला. त्यांनी म्हटले की, जर ‘लाडली बहना’ हेच मोठ्या विजयाचे कारण असेल तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला सत्ता कशी मिळाली?
चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर त्यांचे यश हिरावून घेण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. दरम्यान, भाजप पक्षश्रेष्ठींनी लवकर मुख्यमंत्री निवडण्याचे कोणतेही संकेत न देऊन शिवराजसिंह यांना प्रतीक्षेत ठेवले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख अद्याप कळालेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दिल्लीत मुख्यमंत्री निवडण्याची तशी घाई नाही, असे पत्रकारांना सांगितले.
हेही आहेत शर्यतीत...भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, नरेंद्रसिंह तोमर आणि प्रल्हाद पटेल हे या पदासाठी इतर दावेदार आहेत; परंतु कोणीही ते शर्यतीत असल्याचे मान्य केले नाही. भाजपचे वजनदार नेते विजयवर्गीय हे शाह यांच्या निकटवर्तीयांमध्ये आघाडीवर आहेत.
मी कधीच दावेदार नव्हतो : शिवराजसिंहमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी सांगितले की, मी यापूर्वी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार नव्हतो किंवा आताही नाही. पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने, भाजपने मला जे काही काम दिले आहे ते मी नेहमीच समर्पण आणि प्रामाणिकपणे पार पाडले आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली शक्तिशाली भारताची निर्मिती होत आहे. मोदीजी हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला नेहमीच अभिमान आणि आनंद वाटतो.