मध्य प्रदेशातमुख्यमंत्री पदाच्या नावावर सस्पेंस कायम आहे. असे असतानाच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा इंदूर-१चे आमदार कैलाश विजयवर्गीय यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री पदाच्या नावासंदर्भातील सस्पेन्स रविवारी संपुष्टात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. ते भोपाळमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.
कैलाश विजयवर्गीय हे गुरुवारी भोपाळमध्ये होते. त्यांनी एका खासगी रुग्णालयात असलेले भाजप कार्यकर्ते देवेंद्र सिंह ठाकूर यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. देवेंद्र ठाकूर यांच्यावर काँग्रेस आमदार समर्थिक काही गुंडांनी तलवारीने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप आहे.
यावेळी, 'लाडली बहना' योजनेमुळे विजय मिळाला का? अशा आशयाच्या प्रश्नावर बोलताना कैलाश विजयवर्गीय पुन्हा एकदा म्हणाले की, तीनही राज्यांत मोदी मॅजिक चालले, सर्व योजनांच्या प्रभावामुळे विजय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सर्वात मोठे आहे. एवढेच नाही, तर 'लाडली बहना' राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये होती का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी केला.
विजयवर्गीय म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, अमित शाह यांची रणनीती आणि जेपी नड्डा यांच्या पोलिंग बूथच्या प्लॅनिंगमुळे हे यश मिळाले आहे. यावेळी, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील आपल्या नावासंदर्भात बोलताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत डझनभर नावे आहेत. यात माझे नाव चालविल्याबद्दल धन्यवाद. मुख्यमंत्री पदाच्या नावा संदर्भातील सस्पेन्स रविवारपर्यंत संपुष्टात येईल.
उत्तर प्रदेशात भाजपला 230 पैकी 163 जागांवर विजय मिळाला आहे. तसेच, काँग्रेसला 66 जागा मिळाल्या आहेत. तर एक सीट इतरांना मिळाली आहे.