हरीश गुप्ता नवी दिल्ली : मध्यप्रदेशात १ ऑक्टोबर रोजी इंडिया आघाडीची सभा घेण्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी नकार दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील पक्षांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर, काँग्रेस पक्ष नेतृत्वानेही या मुद्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी १ ऑक्टोबर रोजी भोपाळमध्ये सभा घेण्याचे निश्चित करण्यापूर्वी सल्लाही घेतला नाही, त्यामुळे कमलनाथ हे नाराज आहेत. कमलनाथ यांनी गांधी कुटुंबातील सदस्यांना सांगितले आहे की, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी राज्यातील काँग्रेस पक्ष हा भाजपसोबत आभासी युद्ध करत आहे. दरम्यान, यानंतर ही रॅली रद्द करण्यात आली.
काँग्रेसने इंडिया आघाडीतील पक्षांना सांगितले की, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या संयुक्त रॅलीसाठी तयारी करणे कठीण होईल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पाही याच कारणामुळे अडचणीत आला आहे. कमलनाथ यांनी स्पष्ट केले की, भाजपचा सामना करण्यासाठी राज्यातील काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसह भाजपचे नेते राज्यात अक्षरश: तळ ठोकून आहेत. दुसरे म्हणजे, समाजवादी पक्ष, आप आणि इतर पक्षांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याची त्यांची योजना आधीच जाहीर केली आहे.
हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या मुद्द्यावर कमलनाथ यांचे इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी देखील मतभेद आहेत. तर, द्रमुकची उपस्थिती काँग्रेससाठी पेच निर्माण करणारी ठरणार आहे.
कमलनाथ हे आरएसएस आणि भाजपच्या नेत्यांपेक्षा कट्टर हिंदू म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी भाजपशी स्पर्धा करत आहेत. साधू-संत भाजपचा प्रचार करत असताना त्यांनी भोपाळमध्ये बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक झाली होती. यावेळी काँग्रेस नेतृत्वाने भोपाळ येथे विरोधी पक्षांची संयुक्त सभा घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.