भोपाळ - देशातील लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाप्रणित एनडीए आणि काँग्रेससह इंडिया आघाडीने रणशिंग फुंकले आहे. काँग्रेस, भाजपासह इतरही प्रादेशिक पक्षांच्यावतीने निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा होत आहे. तर, पहिल्या टप्प्यात जिथं मतदान होत आहे, त्याठिकाणी उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातील विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे, नितीन गडकरींसह विदर्भातील बड्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सुपुत्र नकुल नाथ यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
मध्य प्रदेशच्याछिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून नकुल नाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, अर्जासोबत त्यांनी वैयक्तिक माहितीसह पार्श्वभूमी आणि संपत्तीचं विवरणही जोडलं आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे ७०० कोटींची संपत्ती आहे. नुकल नाथ यांच्या संपत्तीत गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत ४० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रोकड, शेअर्स आणि बाँडसह ६४९.५१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तर, ४८.०८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता नकुल नाथ यांनी निवडणूक आयोगाकडील विवरण पत्रात घोषित केली आहे.
मध्य प्रदेशातील प्रभावी काँग्रेस नेते म्हणून कमलनाथ यांच्याकडे पाहिले जाते. कलमनाथ यांचे सुपुत्र हे गत २०१९ च्या निवडणुकीत ४७५ करोडपती खासदारांच्या यादीत अव्वल स्थानावर होते. एडीआर म्हणजेच असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार नकुल नाथ यांनी २०१९ मध्ये ६६० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यावेळीही, त्यांनी छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे राज्यातून निवडून आलेले एकमेव खासदार नकुल नाथ ठरले होते.
माजी मुख्यमंत्री कमल नाथ हे नेहमी विमानाने प्रवास करतात, गत विधानसभा निवडणुकांच्या संपत्ती विवरण पत्रानुसार त्यांची संपत्ती १३४ कोटी एवढी आहे. त्यामुळे, वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती ५ पटीने अधिक आहे. विशेष म्हणजे कमलनाथ यांनी याच छिंदवाडा मतदारसंघातून ९ वेळा विजय मिळवला आहे. तर, त्यांच्या मुलाने गतवर्षी पहिल्यांदाच येथून खासदारकी मिळवली. आता, नकुल नाथ यांना भाजपाच्या विवेक साहू यांचे आव्हान असणार आहे.