- अभिलाष खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्क भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ (७७) यांना पदावरून बाजूला करत पक्ष नेतृत्वाने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का दिला आहे. यानिमित्ताने पक्षाने नेतृत्वाची पिढीच बदलली आहे. तथापि, नव्या बदलांमुळे पक्ष कार्यकर्ते मात्र खुश आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (७६) यांचे चिरंजीव जयवर्धन सिंह आणि अन्य एक नेते अजय सिंह यांना कोणतीही जबाबदारी देण्यास पक्षाने नकार दिला आहे. यामुळे मध्य प्रदेशातील राजकारणात दिग्विजय सिंह युगाचा हा अस्त मानला जात आहे. छिंदवाडा येथून १९८० मध्ये लोकसभा निवडणूक लढवत कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या राजकारणात प्रवेश केला. तर, दिग्विजय सिंह हे १९८० च्या दशकात अर्जुन सिंह यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. तेव्हापासून एकेकाळी अगदी जवळचे असलेले दोन्ही नेते राज्याच्या राजकारणात एक प्रकारे वर्चस्व गाजवत होते.
नव्या चेहऱ्यांना संधी आता कमलनाथ हे छिंदवाडा येथून आमदार आहेत आणि त्यांचे चिरंजीव नकुल हे स्थानिक खासदार आहेत. राऊ येथून पराभूत झालेले उमेदवार जितू पटवारी हे आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. कमलनाथ यांची सक्रिय राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याचे हे संकेत मानले जात आहेत. दिग्विजय सिंह हे राज्यसभेत खासदार आहेत. याचवेळी पक्षाने उमंग सिंघार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे.
दिग्विजय सिंह हे दोनवेळा प्रदेशाध्यक्ष होते. १९९३ मध्ये ते मुख्यमंत्री झाले. २००३ मध्ये त्यांचा पराभव झाला. कमलनाथ यांनी यावेळी केंद्रीय राजकारणावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने २०१८ मध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्या, पण त्यांचे सरकार १५ महिन्यांतच पडले.