कूनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू; चार महिन्यात 3 पिलांसह 8 चित्ते दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 05:36 PM2023-07-14T17:36:50+5:302023-07-14T17:36:56+5:30
मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये शुक्रवारी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला.
Kuno National Park: मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवारी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. कुनोमध्ये आतापर्यंत 3 पिलांसह एकूण 8 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 'दक्ष'चा मृत्यू झाला. कुनोतील पहिल्या चित्त्याचा मृत्यू किडनीच्या समस्येमुळे यावर्षी 27 मार्च रोजी झाला होता.
चित्त्यांच्या मृत्यूमुळे आणखी चित्ते कुनोत ठेवण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुनो राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 748 चौरस किमी आहे. या क्षेत्राची क्षमता तपासल्यानंतर आणखी पाच चित्ते जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, परवानगीदेखील मिळाली आहे. यामध्ये तीन मादा आणि दोन नर चित्ते आणले जातील.
गेल्या वर्षी 17 सप्टेंबर 2022 रोजी पीएम नरेंद्र मोदींनी भारतातून नामशेष झालेला चित्ता परत आणण्यासाठी चित्ता प्रकल्पाची सुरुवात केली होती. पण एकामागून एक चित्त्याचा मृत्यू होत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात वनमंत्री विजय शहा यांनी चित्ता प्रकल्पावर आतापर्यंत एकूण 32 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती दिली आहे.