‘लाडली बहना’ की ‘नारी सन्मान’? मध्य प्रदेशात महिलांचे मतदान वाढले, फायदा मतदान यंत्रात बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 08:49 AM2023-11-29T08:49:43+5:302023-11-29T08:50:38+5:30
मध्य प्रदेशात २,५३३ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात कैद झाले आहे. मतदारांनी दिलेला काैल ३ डिसेंबरला उघड हाेणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी महिलांच्या मतदानात २ टक्के एवढी घसघशीत वाढ झाली आहे.
भाेपाळ : मध्य प्रदेशात २,५३३ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात कैद झाले आहे. मतदारांनी दिलेला काैल ३ डिसेंबरला उघड हाेणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी महिलांच्या मतदानात २ टक्के एवढी घसघशीत वाढ झाली आहे. ही मते काेणाच्या पारड्यात गेली, हे मतमाेजणीच्या दिवशी कळेल. मात्र, महिलांचे वाढलेले मतदान निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस हे दाेन्ही पक्ष त्यावर दावा करत आहेत. भाजपने यास ‘लाडली बहना’ याेजनेचा परिणाम म्हटले आहे. तर, काँग्रेसने ही मते भाजपवरील नाराजी दर्शवित असल्याचे म्हटले आहे.
काेण काय देणार?
भाजप
राज्यात ‘लाडली बहना’ याेजना सुरू केली. सुरुवातीला १ हजार रुपये दरमहा दिले जात हाेते. आता ही रक्कम वाढवून १,२५० रुपये केली असून त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करत रक्कम ३ हजार रुपयांपर्यंत नेण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.
काँग्रेस
काँग्रेसने ‘नारी सन्मान’ योजनेचा उल्लेख वचनपत्रात केला असून राज्यात सरकार स्थापन झाल्यास महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. गॅस सिलिंडर ५०० रुपयांमध्ये देण्याचाही उल्लेख काँग्रेसच्या वचनपत्रात आहे.