भोपाळ - मध्य प्रदेश सरकारने उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शाळांची सुट्टी आणखी काही दिवस वाढवली आहे. जून महिना अर्धा संपल्यानंतरही पावसाचे आगमन झाले नाही, याउलट उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच जाणवत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीतही वाढ करण्यात आली आहे. झारखंड सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीत वाढ केली आहे. तर, मध्य प्रदेश सरकारनेही ३० जूनपर्यंत प्राथमिक शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांनी सांगितले की, जून महिना सुरू झाल्यानंतरही अद्याप उन्हाचा कहर जाणवत असून तापमान कमी झालेलं नाही. त्यामुळे, मध्य प्रदेशातील प्राथमिक शाळांची सुट्टी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर, इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांची शाळा पुढील 10 दिवसांसाठी सकाळच्या सत्रात भरणार आहे.
उन्हाचा जोर आणि वाढते तापमान लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीला हे तापमान धोकादायक ठरू नये, म्हणून मध्य प्रदेश सरकारने शाळांची सुट्टी जून महिनाअखेरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे, ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर, त्यावरील वर्गातील विद्यार्थ्यांची शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही अद्याप पावसाचे आगमन झाले असून उन्हाची तीव्रता प्रकर्षाने दिसून येत आहे.
दरम्यान, झारखंड राज्यातील केजी ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या शाळा २१ जून पर्यंत बंदच राहणार आहेत. तर इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे शाळा आणि कॉलेजेस सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहतील. राज्यातील सर्वच सरकारी, खासगी आणि सरकारी अनुदान प्राप्त शाळांना लागू करण्यात येत आहेत. या काळात विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीसंदर्भात वेगळा आदेश जारी करण्यात येईल. राज्यात अद्याप असलेल्या कडक उन्हाळ्यामुळे शासनाने हा निर्णय घेतल्याचे रवि कुमार यांनी सांगितले.