पदर पसरला, डोळ्यात पाणी; भाजपच्या मंत्र्याने चक्क मतांची भीकच मागितली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 08:59 PM2023-11-13T20:59:10+5:302023-11-13T21:00:19+5:30

मुख्यमंत्र्यांनीही भाषण करताना येथील जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत

Layers spread, tears in the eyes; The state minister of bjp suresh dhakad almost begged for votes in madhya pradesh pohari constituency | पदर पसरला, डोळ्यात पाणी; भाजपच्या मंत्र्याने चक्क मतांची भीकच मागितली

पदर पसरला, डोळ्यात पाणी; भाजपच्या मंत्र्याने चक्क मतांची भीकच मागितली

भोपाळ - देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे, बड्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रचार सभांचं आयोजन होत आहे. मध्य प्रदेशमध्येभाजपाने पुन्हा एकदा जोर लावला असून सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने जोरदार प्रचार सुरू केला आहे. शिवपुरी जिल्ह्यात आज मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी, जनसभेला संबोधित करताना विद्यमान राज्यमंत्र्यांनी चक्क मतदारांपुढे मतांची भीक मागितली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही भाषण करताना येथील जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. 

येथील पोहरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या शिंदे समर्थक आमदार आणि राज्यमंत्री असलेल्या सुरेश धाकड यांनी जनसभेला संबोधित करताना चक्क शर्टाचा पदर लोकांपुढे पसरला होता. यावेळी, बोलताना त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. मी तुमच्याकडे मतांची भीक मागत आहे, असे म्हणत त्यांनी व्यासपीठावरच साष्टांग दंडवत घेतला.

मंत्री सुरेश धाकड यांनी व्यासपीठावरुन मतांची भीक मागितली. माझ्यासारख्या एका गरिब शेतकऱ्याच्या मुलाला महाराज ज्योतिर्रादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री मामा यांनी वल्लभ भवनमध्ये पोहोचवलं. त्यामुळे, माझी लाज राखा, मला मतदान करा आणि १७ नोव्हेंबरला कमळाच्या बटणावर मतदान करा, अशी विनंती मंत्री सुरेश धाकड यांनी केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हेही मंचावर उपस्थित होते. शिवराज सिंह यांनीही येथील सभेला संबोधित करताना वीजेच्या बिलात माफी देत असल्याची घोषणा केली. तसेच, गरीब व मध्यमवर्गीयांना केवळ ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, पोहरी विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून शिंदे समर्थक मंत्री सुरेश धाकड राठखेडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथे भाजपा, काँग्रेससह बसपाचाही उमेदवार उभा आहे. त्यामुळे, येथील लढत तिरंगी मानली जात आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या प्रद्युम्मन वर्मा यांनी भाजपा उमेदवार धाडक यांचं गणित बिघडवलं आहे. त्यामुळे, भाजप उमेदवाराची सीट धोक्यात आल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे. 

Web Title: Layers spread, tears in the eyes; The state minister of bjp suresh dhakad almost begged for votes in madhya pradesh pohari constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.