Leopard In Village: जंगलात राहणारे हिंस्र प्राणी अनेकदा अन्नाच्या शोधात रहिवासी भागात घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा हे प्राणी पाळीव प्राण्यांसह माणसांवरही हल्ले करतात. वन विभागाची टीम बोलावून यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम राबवावी लागते. पण, सध्या एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. एक बिबट्या गावात शिरला, पण गावकऱ्यांनी घाबरण्याऐवजी त्याच्यासोबत सेल्फी घेतली.
गावकऱ्यांनी बिबट्याला पाहिल्यानंतर ते चकित झाले. त्यांनी बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या जागेवरुन हलला नाही. यानंतर ग्रामस्थांनी जवळ जाऊन बिबट्याला हात लावला, तरीदेखील तो जागेवरुन हलला नाही. यानंतर ग्रामस्थांनी त्याला त्रास देणे सुरू केले. काहींनी त्याच्यासोबत सेल्फी काढली, तर काहींनी त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला. तो बिबट्या खूप थकलेला होता, त्यामुळे त्याने कुणावरही हल्ला केला नाही.
IFS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ
या घटनेचा व्हिडिओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केला. त्यांनी व्हिडिओसोबत लिहिले, 'हा प्राणी खूप अशक्त आणि चिंताग्रस्त दिसतोय. त्याला एकटं सोडा...एका छोट्या चुकीमुळे मोठी घटना घडू शकते.' क्लिपमध्ये ग्रामस्थ बिबट्याजवळ बसलेले दिसत आहेत. यातील काहीजण त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत, तर काहीजण त्याला हात लावत आहेत.
या घटनेच्या दुसऱ्या एका व्हिडिओत बिबट्या निघून जात असताना एकजण त्याच्या अंगावर बसण्याचा प्रयत्न करत आहे. तर, काहीजण त्याच्या अंगावरुन हात फिरवताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या टीमने बिबट्याची सुटका केली. त्याला उपचारासाठी पाठवण्यात आले. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील आहे.