दमोह : माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशातील दमोह शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच ठेवणार असल्याचेही सांगितले. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये लोकांनी काँग्रेसला सत्ता दिली; पण त्यांचे मुख्यमंत्री सट्टेबाजी आणि काळा पैसा निर्माण करण्यात गुंतलेले आढळले, असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले की, २०१४ नंतर देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर गेली. २०० वर्षांपेक्षा जास्त काळ देशावर राज्य करणाऱ्या यूकेला मागे टाकले. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास राज्यांमध्ये ८५ टक्के कमिशन मशीन काम करेन. माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की, केंद्राने जाहीर केलेल्या प्रत्येक एक रुपयापैकी केवळ १५ पैसे लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात. दरम्यान, गरीब लोकांसाठी मोफत रेशन योजना पाच वर्षांपर्यंत वाढवण्याच्या आश्वासनाबाबत काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत.
नितीशकुमार यांच्यावर नाव न घेता केली टीका गुना : इंडिया आघाडीतील एका वरिष्ठ नेत्याने विधानसभेत महिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरली; परंतु, विरोधी गटाच्या घटकांनी एक शब्दही उच्चारला नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान म्हणाले की, अशी दृष्टी असलेले लोक तुमचा सन्मान आणि आदर कसा ठेवतील? केंद्रात भाजपच्या १० वर्षांच्या काळात मध्य प्रदेश सरकारचा राज्याचा अर्थसंकल्प ८०,००० कोटी रुपयांवरून तीन लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी पुरेसा निधी दिला नाही.