राजधानीच्या शहरात काँटे की टक्कर अपेक्षित; भोपाळ मतदारसंघ भाजपा राखणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 05:50 AM2024-04-26T05:50:39+5:302024-04-26T05:50:58+5:30
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळच्या विद्यमान खासदार. मात्र, त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली
विनय उपासनी
मुंबई : गेल्या तीन दशकांपासून भोपाळ लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रात सरकार कोणाचेही असो भोपाळच्या मतदारांनी कायमच भाजपची साथ दिली आहे. यंदाही हा कल कायम राहणार असल्याची चिन्हे असली तरी काँग्रेस याठिकाणी चांगली लढत देईल, असे निरीक्षकांचे मत आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळच्या विद्यमान खासदार. मात्र, त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली. त्यामुळे ठाकूर यांना येथून पुन्हा उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या जागी शहराचे माजी महापौर आलोक शर्मा यांना पक्षाने तिकीट दिले आहे. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरुण श्रीवास्तव यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
हा पारंपरिक मतदारसंघ असला तरी भाजपने गाफील न राहण्याचे ठरवले आहे. म्हणूनच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १८ दिवसांत पाचवेळा राज्यात पाऊल ठेवले. २४ एप्रिलला पंतप्रधानांचा रोड शोही झाला. दुसरीकडे, काँग्रेसने इलेक्टोरल बॉण्ड हा विषय लावून धरला आहे. त्यातच आता काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील संपत्तीच्या फेरवाटपाचा मुद्दा चर्चेत आल्याने वातावरण बदलण्याची चिन्हे आहेत.
२०१९ मध्ये काय घडले?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
भाजप (विजयी)
८,६६,४८२
दिग्विजय सिंग
काँग्रेस (पराभूत)
५,०१,६६०