गुना के दिल में सिंधिया? महारानी उतरल्या प्रचारात; भाजपाकडून ज्योतिरादित्य सिंधियांना तिकिट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 08:47 AM2024-04-25T08:47:41+5:302024-04-25T08:48:33+5:30
ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपने तिकीट दिले असल्याने येथील मतदार भावनिकदृष्ट्या त्यांच्याचकडे झुकलेला असल्याचे चित्र सध्या येथे दिसत आहे
विनय उपासनी
मुंबई : सिंधिया राजघराणे आणि गुना यांचा फार जुना संबंध आहे. गुनातील मतदारांनी नेहमीच राजघराण्याला साथ दिली आहे. या मतदारसंघातून आतापर्यंत विजयाराजे, माधवराव आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना लोकसभेत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले आहे, म्हणजे त्या अर्थाने गुना हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला. मात्र, गेल्या वर्षी ही परंपरा खंडित झाली. २०१९ मध्ये भाजपच्या कृष्णपालसिंह यांनी ज्योतिरादित्य यांचा पराभव केला होता.
ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपने गुनातून तिकीट दिले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या राव यादवेंद्रसिंह यादव यांनी भाजप सोडून काँग्रेसच्या गोटात जाणे पसंत केले. काँग्रेसने त्यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये लढत होईल. विद्यमान खासदार कृष्णपाल हे ज्योतिरादित्य यांचा प्रचार करतील.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपने तिकीट दिले असल्याने येथील मतदार भावनिकदृष्ट्या त्यांच्याचकडे झुकलेला असल्याचे चित्र सध्या येथे दिसत आहे. स्वत: महारानी, म्हणजे ज्योतिरादित्य यांच्या पत्नी, प्रियदर्शनीराजे या प्रचारात उतरल्या आहेत. त्यांच्या मेहंदीची चर्चा आहे. त्यावर ‘दिल मे सिंधिया’ असे कोरलेले आहे. काँग्रेसचा येथे फारसा जोर दिसत नाही. भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे.