बसचे भाडे नव्हते म्हणून 90 वर्षीय महिलेने ट्रायसायकलने केला 180KM प्रवास, Video व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 03:02 PM2023-06-08T15:02:58+5:302023-06-08T15:11:51+5:30
मुलीला भेटण्याची ओढ, ट्रायसायकलवरुन निघाली वृद्ध महिला; व्हिडिओ समोर येताच लोकांनी सरकारवर उपस्थित केले प्रश्न.
मध्य प्रदेशातील अशोकनगरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका वृद्ध अपंग महिलेने आपल्या मुलीला भेटण्यासाठी ट्रायसायकलवरुन 180 किलोमीटरचा प्रवास केला. महिलेकडे बसचे भाडे नसल्यामुळे ती आपल्या ट्रायसायकलवरुनच मुलीकडे निघाली. हा प्रवास करण्यासाठी त्या महिलेला आठ दिवस लागले.
महिला सुमारे 90 वर्षांची आहे. ज्या वयात लोकांना नीट चालता येत नाही, त्या वयात या महिलेने तिच्या मुलीच्या घरी जाण्यासाठी 180 किलोमीटरचा प्रवास केला आमि तोही कडक उन्हात. महिलेने प्रवासासाठी काही अन्न सोबत ठेवले. जिथे जमेल तिथे ट्रायसायकलचे पॅडेल मारले आणि जिथे चढ आला, तिथे हाताने चाक ओढले. मुलीकडे जाण्यासाठी महिलेला खूप संघर्ष करावा लागला.
महिलेच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि थरथरत्या आवाजावरुनच तिच्या वयाचा अंदाज सहज लावता येईल. फक्त पैशाअभावी वृद्ध महिलेला असा खडतर प्रवास करावा लागल्याने अनेकजण सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकार मोठमोठी आश्वासने देतात, हजारो कोटी रुपयांच्या योजना चालवतात, मात्र अशा गरजू लोकांपर्यंत योजना पोहचत नाहीत. राजगड-पाचोर हायवेवर महिला ट्रायसायकल चालवत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरण सर्वांसमोर आले.